भक्तिचेनि योगे देव..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:07 PM2019-12-28T18:07:56+5:302019-12-28T18:10:30+5:30
जीवन व्यवहार्थ केलेले प्रत्येक कर्म भगवंताला आवडेल असेच करणे म्हणजे भक्ती होय.
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
श्रीसमर्थ रामदास स्वामी हे भक्तीमार्गी संत होते. समाज जीवनात भक्तीचाच प्रचार आणि प्रसार करणे हेच श्रीसमर्थ संप्रदायाचे प्रधान प्रयोजन होते. श्रीमद् ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थांनी भक्तीमार्गाचेच विवेचन केले आहे. ग्रंथारंभीच श्रीसमर्थ म्हणतात -
ग्रंथानाम दासबोध । गुरु शिष्यांचा संवाद ॥
येथ बोलिला विशद । भक्तीमार्ग ॥
श्रीमद् ग्रंथराज दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. शिष्यांनी विचारलेले प्रश्न व श्रीगुरूंनी दिलेली उत्तरे, यातूनच हा ग्रंथ साकारला आहे. अध्यात्मशास्त्रांत ईश्वरप्राप्तीचे जे विविध मार्ग सांगितले त्यात कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग व भक्तीयोग अशा विविध मार्गांचा समावेश आहे. संत कोणत्याही विशिष्ट मार्गाचे आग्रही नसतात. साधकाच्या अधिकारानुसार ज्याने त्याने आपला मार्ग निवडावयाचा असतो. असे असले तरी प्रापंचिकासाठी भक्तीमार्ग हा सहज सुलभ आहे. प्रापंचिक साधकाने श्रीसमर्थांना प्रश्न विचारला, गुरुदेव..!आमच्यासाठी दुःखमुक्तीचा व ईश्वरप्राप्तीचा मार्ग सांगा ना..? श्रीसमर्थ म्हणाले -
भक्तीचेनि योगे देव । निश्चये पावती मानव ॥
ऐसा आहे अभिप्रावो । इयें ग्रंथी ॥
शुद्ध भक्तीचा निश्चयो। शुद्ध ज्ञानाचा निश्चयो ॥
आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥
या ठिकाणी भक्तीचेनी योगे देव। या पदात योग हा शब्द आला आहे. युज् धातूपासून हा शब्द बनला आहे. युज् म्हणजे जोडणे. भक्तीच्या सहाय्याने परमेश्वराशी जोडले जाणे याचे नाव भक्तीयोग. आता आपण म्हणाल, भक्ती म्हणजे काय..? श्रीमद् भागवतात नवयोगींद्रांनी निमीराजाला भक्तीचे लक्षण सांगितले आहे. योगींद्र म्हणाले, राजा..!
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वाऽनुसृतः स्वभावात् ॥
करोमि यद् यद् सकलं परस्मै: । नारायणायेति समर्पयामि ॥
काया, वाचा, मन, बुद्धी व अन्य इंद्रियांनी होणारी सर्व कर्मे परमेश्वराला समर्पण करणे म्हणजेच भक्ती. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की, परमेश्वराला कर्म समर्पण कसे करणार.? या प्रश्नाचे उत्तर असे की, कर्म समर्पण करणे म्हणजे ज्या कर्माने ईश्वराला संतोष होईल असेच कर्म करणे. श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात -
देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावे तेणेंची रीती ॥
येणे करिता भगवंती । सख्य घडे नेमस्त ॥
आपण तैसेची वर्तावे । आपणांसि तेचि आवडावे ॥
मनासारिखा होता स्वभावे । सख्य घडे नेमस्त ॥
जीवन व्यवहार्थ केलेले प्रत्येक कर्म भगवंताला आवडेल असेच करणे म्हणजे भक्ती होय. या पुढील निरुपण पुढील लेखात बघू..!
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. ९४२१३४४९६० )