समाधानी मन पुरविते वैचारिक खाद्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 07:20 AM2019-05-06T07:20:41+5:302019-05-06T07:21:02+5:30
ज्यांनी सर्व इंद्रियांना शांतीचे अलंकार घातले आहेत, ज्यांचे चित्त सर्वव्यापक आहे, ज्यांच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केले आहे
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
ज्यांनी सर्व इंद्रियांना शांतीचे अलंकार घातले आहेत, ज्यांचे चित्त सर्वव्यापक आहे, ज्यांच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केले आहे, जे पूर्णत: तृप्त होऊन जीवन जगतात त्यांचे मन केवळ एक उपास्य व दुसरा उपासक असा भेदभाव करत नाही. थोडक्यात दुजेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. अशा व्यक्तींचे मन समाधानी असते. समाधानी मन जीवनात वैचारिक खाद्य पुरवित असते. म्हणून म्हणतात, समाधानी मन शांतीचे दैवत असते. कारण तेथे सात्त्विकतेचे मळे असतात. त्या मळ्यात ब्रह्मानंदरूपी फळे आलेली असतात. ते फळेच मोक्षाची वाट दाखवतात. कारण त्यांच्याकडे द्वेषरुपी तण राहत नाही. आसुरी प्रकृतीवर त्यांनी विजय मिळविलेला असतो. तमोगुणाला हद्दपार केलेले असते. त्यांच्या मनात भ्रांतीच्या कल्पना नसतात. वाचा व्यर्थ शिणवत नसतात. त्यांचे मन अथांग सागरासारखे असते. त्यांची भक्ती एकविध असते. आपल्या उपास्य दैवताला ते प्रेमाने भजतात आणि शेवटी आपण व उपास्य दैवत वेगळे नाही याची परिपूर्ण जाणीव त्यांना होते. ज्यांच्या कर्माचरणामध्ये सहज नीती सापडत असते असे जे व्यापक अनुभवाचे पुष्प आहेत ते दैव प्रकृतीचे पुष्प जाणले पाहिजे. कारण त्यांचे ‘मन’ मीच होऊन माझी सेवा करण्यात गुंतलेले असते. म्हणजे शुद्ध मनरुपी गंगेत न्हाणे होय. मन शुद्ध झाले की चित्त स्थिर होते. चित्त स्थिर झाले की, अज्ञानरुपी अंध:कार नाहीसा होतो. मग आत्मज्ञानरुपी प्रकाशातच जगता येते. त्याचा आनंद घेता येतो. आत्मसुखात ओले चिंब होता येते. सर्व इंद्रियांवर शांतीचे अलंकार धारण करता येतात. इंद्रियांवर ताबा मिळवता येतो. आत्मरुपाशी एकरूप होता येते. स्वरुपस्थितीला जाणता येते. असे दुर्लभ लोक असतात तेच या स्थितीला पोहोचतात. यासाठी आपल्या मनात समरसतेचा अनुभव करता आला पाहिजे. त्यांच्या जीवनात ही स्थिती प्राप्त झालेली असते. त्याचे कारण त्यांचे तृप्त व स्थिर मन होय.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)