आनंद तरंग - देशाबद्दल कृतज्ञता हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:48 AM2020-04-14T01:48:32+5:302020-04-14T01:49:22+5:30
सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले
राष्ट्रभक्ती म्हणजे आपलं आपल्या राष्ट्रावर मनापासून प्रेम हवं. जसं गणपती तुम्हाला प्रिय आहे, तितकाच भारत देशही प्रिय असायला हवा. देशावर प्रेम करायचं म्हणजे फक्त १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला तिरंग्याबद्दल आदर व्यक्त करायचा असं नाही, तर आयुष्यभर देशाबद्दल कृतज्ञता हवी. यासाठी देशाबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी कटाक्षाने पाळून ही कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. वास्तविक, राष्ट्रध्वज हा स्वतंत्र भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचा मान राखणं म्हणजेच देशावरचं प्रेम अन् कृतज्ञता व्यक्त करणं होय.
सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले. देशावर असीम प्रेम केले; पण आज स्वतंत्र भारताचे चित्र मात्र काय सांगते? आपल्या देशावर आपण प्रेम केलं पाहिजे. नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. हे प्रेम लहानसहान गोष्टींतून व्यक्त होत असतं. सद्गुरू एक उदाहरण नेहमी देत. ‘आपल्याला कितीही राग आला तरी घरातील वस्तू तोडून-फोडून टाकतो का? तर नाही... पण बाहेर एखादी गैरसोय झाली की लगेच तोडफोड करतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. हे नुकसान असतं आपल्याच देशाच्या साधनसंपत्तीचं, पर्यायाने आपलंच.’
प्रल्हाद वामनराव पै