आनंदाची सृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 06:15 PM2020-05-25T18:15:21+5:302020-05-25T18:18:55+5:30

आपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात.

The creation of happiness | आनंदाची सृष्टी

आनंदाची सृष्टी

googlenewsNext
ठळक मुद्दे तुकोबारायांनी वापरलेला ‘निमाले’ हा शब्द आपण आपल्या जीवनात अंगीकारून मर्यादित भोगांचा स्वीकार करूया व आपण आनंदी बनून आपली सृष्टीही आनंदी बनवूया. आनंद तरंग

इंद्रजित देशमुख-
आज वर्तमानात प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी, पण न मिळणारी गोष्ट म्हणजे आनंद. तसं पाहिलं तर आनंद ही एक अवस्था आहे. आपल्या प्रयत्नानंतर प्राप्त होणारी. प्रत्येकाला ज्ञात-अज्ञातपणे ती अवस्था हवी आहे; पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य प्रयत्नांचा प्रकार व दिशा यांची माहिती नसल्यामुळे सगळ्यांनाच ती आनंदानुभूती घेता येत नाही. याच अनुभूतीच्या योग्य व सूत्रबद्ध दिशेचा उल्लेख आमचे तुकोबाराय आपल्या एका अभंगात करताना म्हणतात,
‘काम, क्रोध, लोभ निमाले ठायीची।
अवघी आनंदाची सृष्टी झाली।।’
जीवनात भरभरून आनंद यावा यासाठी तुकोबाराय जो मार्ग सांगत आहेत, त्या मार्गाचा अवलंब केला की स्वत: त्या आनंदाची अनुभूती घेता येतेच; पण आपल्या अस्तित्वाने आपला भोवतालदेखील त्याच आनंद तरंगांनी कंपित करता येतो व त्यामुळे जणू ही अवघी सृष्टीच आनंदी भासू लागते. त्यासाठी काय करावं लागत असेल तर फक्त जीवनातील नियमन वाढवायचं. वास्तविक जीवनात विकार आणि विकारविषयक भोग यांच्या बाबतीत ब-याचदा आपली अपरिहार्यता किंवा नाइलाज असतो, अशा वेळी जीवनातील त्या विकाराचा पूर्णपणे त्याग करता येत नाही. आपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात. तुकोबारायांनी वापरलेला ‘निमाले’ हा शब्द आपण आपल्या जीवनात अंगीकारून मर्यादित भोगांचा स्वीकार करूया व आपण आनंदी बनून आपली सृष्टीही आनंदी बनवूया.

Web Title: The creation of happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.