कालबाह्य दोऱ्या कापा व आनंदाने राहा.!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 07:02 PM2019-12-30T19:02:30+5:302019-12-30T19:02:47+5:30

तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही...

Cut out expired ropes and live happily ever after! | कालबाह्य दोऱ्या कापा व आनंदाने राहा.!  

कालबाह्य दोऱ्या कापा व आनंदाने राहा.!  

Next

- डॉ . दत्ता कोहिनकर
एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले.  मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला ..., 
"अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध."
"महाराज, पण दोरी नाहीये न"_
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला.
सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. 

तो म्हणाला ..., 
"अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस ?"_
"पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न "_
पुजारी म्हणाला,  "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा".
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य ? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!
पुजारी म्हणाला   "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत.‌ 
 लंगडत चालणाऱ्या हत्तीचा माहूत लंगडत चालायचा म्हणून गौतम बुद्धांनी हत्तीचा माहूत बदलला,हत्ती लंगडायचा थांबला.जसा हत्ती माहूताच अंधानुकरण करत होता. तशाच काही जुन्या चालीरीतींच आपण अंधानुकरण करतोय मित्रांनो या लंगड्या हत्तीवर आज उपचार करा. जुन्या चालिरीती जर जीवनात दुःख आणत असतील तर त्या बदला. या बदलाची आज नितांत गरज आहे. 
मित्रांनो अदृश्य दोऱ्या तोडा ,
कालबाह्य दोऱ्या कापा व आनंदाने रहा . 
तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल .... !!!

Web Title: Cut out expired ropes and live happily ever after!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.