अवघा रंग एक झाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:59 AM2018-07-15T00:59:10+5:302018-07-19T13:23:16+5:30

. The dark color becomes one. Dindi walking | अवघा रंग एक झाला...

अवघा रंग एक झाला...

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
वैष्णवांचा मेळा वारीला चाललाय. आज सगळीकडे आनंदीआनंद दाटून आलाय. वारकऱ्यांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहतोय. ‘अवघा रंग एक झाला’ ही अवस्था आहे. सावळा पांडुरंग भेटणार आहे. माहेरची ओढ आणि तेथील सुख याविषयी तन्मयता धारण केलेले मन भान हरपून वारीत समरसून जातंय. खरं पाहिलं तर या वारीसाठी एवढं वेडं का व्हायचं? का इतके दिवस सगळी आवराआवर करायची. सगळा संसार सोडून ऊन, पाऊस, वादळ या साºया गोष्टींची तमा न बाळगता पायपीट का करायची? इतर तीर्थांची आणि पंढरी क्षेत्राची तुलना करता नेमकं काय मिळतं या वारीतून, याविषयी तुकोबाराय सांगतात -
काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन ।
पंढरीची जाण एक यात्रा ।।
काशी देह विटंबणे द्वारके जाळणे ।
पंढरीसी होणे ब्रह्मरूप ।।
अठरापगड जाती याती सकळहो वैष्णव ।
दुजा नाही भाव पंढरीसी ।।
तुका म्हणे असो अथवा नसो भाव ।
दर्शने पंढरीराव मोक्ष देतो ।।
काशीची यात्रा आम्ही पापनाशासाठी किंवा पुण्य संपादनासाठी किंवा मरणोत्तर मुक्तीसाठी करतो; पण पंढरीची वारी ही निष्काम वृत्तीने करण्याची आहे. काशीची यात्रा मृत्यू जवळ आला की कराविशी वाटते ती एकदाची घडावी असे वाटते; परंतु पंढरीची यात्रा ही एकदाच आणि मृत्यू जवळ आला आहे म्हणून करायची नाही तर न चुकता दरवर्षी जायचे आहे. काशी यात्रा एकट्याने किंवा कुटुंबीयांसमवेत होते; पण पंढरीची वारी दिंडीबरोबर करायची असते. एकमेकांत मिसळून, समतेचा गजर करीत, जात-पात विसरून करायची असते. कारण वारीमध्ये वारकºयांचा गाव, वर्ण, प्रांत, जात आणि व्यक्तित्त्वही संपूर्ण विलीन झालेले असते. विठ्ठलभक्तीच्या भरतीने ओसंडून वाहणारा तो एक जनसागरच असा असतो. या जनसागरातील व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक, तो जनमानसाच्या व्यापक हृदयाचा मोक्ष अनुभवतोच. तुकोबाराय आणखी एका अभंगात म्हणतात -
वाराणसी गया पाहिली द्वारका ।
परि नये तुका पंढरीचा ।।
पंढरीच्या लोका नाही अभिमान ।
पाया पडेजन एकमेका।।
तुका म्हणे जाये एक वेळा पंढरी ।
तयाचिया घरी यम न ये ।।
इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी थोडासा विरंगुळा मिळेल; पण आयुष्याचा विसावा मिळण्याचे ठिकाण हे पंढरपूर आहे. याचे कारण पंढरपुरामध्ये माणसाचा अभिमान नाहीसा होण्याची एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये समोरच्या प्रत्येकामध्येच पांडुरंग आहे यावर श्रद्धा ठेवून एकमेकांचे जीवभावे दर्शनाची रीत आहे. सात वर्षांचा मुलगा सत्तर वर्षांच्या आजोबांच्या पाया पडतो आणि सत्तर वर्षांचा आजोबा सात वर्षांच्या बाळाच्या पाया पडतो. एकमेका पायी लागण्याच्या व्यवस्थेत ‘जन हेचि जनार्दन’ याचा बोध इथे मिळतो. अभिमान माणसाला घातास कारण ठरतो. अहंकार संपणे ही परमार्थातील उच्चतम अवस्था आहे. जिथे अहंकार संपतो तो कळी आणि काळालाही घाबरत नाही. अहंकार निर्मूलनाचे हे साधे, सोपे आचारधर्म वारकºयाला विश्व कवेत घ्यायला मदत करतात. वारीच्या सहभागासाठी अलीकडे हौशे, गवशे, नवशे लोक येताहेत. हौशे लोक तर जगभरातून येताहेत. हौसेने हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी काही श्रद्धाळू नवसे नवस फेडण्यासाठी येतात. काही गवशे काही मिळविण्यासाठी येतात. वारकºयाला मात्र काहीच मागायचे नाही. त्याचे हे निष्काम व्रत आहे. त्याला देवाजवळ स्वत:साठी काहीच मागायचे नाही, कारण या यात्रेतील शेवटची प्रार्थना ही पसायदानाची असते, ज्यामध्ये एकट्याचे कल्याण नाही. मागितले तर अवघ्या विश्वाचे कल्याण मागितले आहे. या यात्रेच्या निमित्ताने त्याला हवे आहे चंद्रभागेचे स्नान, पांडुरंगाचे दर्शन. बस्स दुसरे काही नको. फक्त दर्शने समाधान याच वृत्तीने ही लक्ष लक्ष पाऊले वाट चालत आहेत. तीच पाऊले देखणी जी परब्रह्म भेटी चालती. भवसागर तुटोनिया परमशांती अनुभवती. या यात्रेतल्या वारकºयांची विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. ही वाट चालताना विठ्ठल आणि संतजनांच्या नुसत्या आठवणीनेही त्यांच्या अंगावर शहारे येतात. कंठात गहिवर दाटतो. डोळ्यात पाणी साचते, म्हणूनच पंढरीच्या यात्रेला दुसºया कुठल्याच यात्रेची सर
येणार नाही, कारण या यात्रेची फलश्रुती हीच आहे की,
भाग गेला शीण गेला ।
अवघा झाला आनंदु ।।
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title: . The dark color becomes one. Dindi walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.