श्री महाकाली, श्री महालक्ष्मी , श्रीमहासरस्वती देवीची पूजा करून देवीसमोर तिसरी माळ बांधावयाचा दिवस

By दा. कृ. सोमण | Published: September 23, 2017 02:20 AM2017-09-23T02:20:23+5:302017-09-23T17:30:22+5:30

Day of preparation of the third gardener in front of the Goddess, worshiping Shri Mahakali, Shri Mahalakshmi, Shri Mahasaraswati Devi. | श्री महाकाली, श्री महालक्ष्मी , श्रीमहासरस्वती देवीची पूजा करून देवीसमोर तिसरी माळ बांधावयाचा दिवस

श्री महाकाली, श्री महालक्ष्मी , श्रीमहासरस्वती देवीची पूजा करून देवीसमोर तिसरी माळ बांधावयाचा दिवस

Next

श्रीमहाकाली

श्रीमहाकाली ही महाकालाची संहारक शक्ती मानली जाते. आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद्र रूपाला ‘महाकाली’ म्हणतात. ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते. मधु-कैटभ या राक्षसांचा नाश करण्यासाठी महाकाली अवतरली, असे देवी भागवतात सांगितलेले आहे. प्रलयकाळी भगवान विष्णू शेषशय्येवर असताना मधु-कैटभ राक्षस ब्रह्मदेवावर हल्ला करू लागले. ब्रह्मदेव विष्णूकडे गेले. विष्णू आणि मधु-कैटभ यांचे घनघोर युद्ध झाले. त्या वेळी मुख, नासिका, आजीतून निर्माण झालेल्या महामायेने राक्षसांचा बुद्धिभेद केला. त्यामुळे दैत्यांनी आत्मनाशाचा मार्ग धरला. राक्षस भगवान विष्णूला म्हणाले, ‘आम्ही तुझ्या युद्ध कौशल्यावर खूश आहोत. तेव्हा इच्छा असेल तर वर मागून घे.’
भगवान विष्णू म्हणाले, ‘माझ्या हातून आपले मरण यावे, असा वर मला द्यावा.’
मधु-कैटभ म्हणाले, ‘तथास्तु! ज्या ठिकाणी पृथ्वीचा भूभाग पाळण्याने झाकलेला नाही. अशा ठिकाणी तू आम्हाला मरण दे.’
विष्णूने त्या राक्षसांना आपल्या मांडीवर घेतले आणि चक्राने त्यांना ठार मारले. या कारण यात ज्या महामायेने भाग घेतला, तीच महाकाली होय. दहा मुखे, दहा भुजा, दहा पाद, खड्ग, चक्र, गदा, धनुष्यबाण, परिघ, शील, भृशुंडी, कमल, शंख ही आयुधे आहेत. महाकालीलाच ‘दक्षिणकाली’ असे म्हटलेले आहे. महाकाली ही परात्पर महाकालाची स्त्रीशक्ती आहे. शाक्त संप्रदायातही महाकालीची उपासना केली जाते. तिचे रूप उग्र असले, तरी ती आपल्या भक्तांसाठी वरदायिनी होते, तसेच ती त्यांचे रक्षणही करते.

श्रीमहालक्ष्मी
श्रीमहालक्ष्मी हे देवीचे एक रूप आहे. हिला दुर्गा, महिषासूरमर्दिनी असेही म्हणतात. ही देवी म्हणजे विष्णुपत्नी नसून, शिवपत्नी दुर्गाच आहे. देवीमाहात्म्य या ग्रंथामध्ये तिची अवतारकथा दिलेली आहे.
एकदा देव आणि दानव यांचे घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये दानवांचा जय झाला. त्यामुळे महिषासूर हा जगाचा स्वामी बनला. पराभूत झालेले सर्व देव ब्रह्मदेवांना घेऊन भगवान विष्णू व शंकर यांच्याकडे आले आणि त्यांनी आपली कहाणी सांगितली. ती कहाणी ऐकून विष्णू आणि शंकर अतिशय क्रोधित झाले. त्यांच्या मुखातून महान तेज बाहेर पडले. ब्रह्मदेव, इंद्र आणि इतर सर्व देवांच्या शरीरातून मोठे तेज बाहेर पडले. ते सर्व तेज एकत्र झाले आणि त्या दिव्य तेजातून एक स्त्री देवता प्रकट झाली. तिने दानवांशी घनघोर युद्ध करून, महिषासूर आणि त्याचे सैन्य यांचा नाश केला. या देवीलाच श्रीमहालक्ष्मी किंवा महिषासूरमर्दिनी म्हणतात. महालक्ष्मीचे रूप ध्यान दुर्गासप्तशतीमध्ये फार सुंदर रितीने दिलेले आहे. हातांमध्ये अक्षमाला, परशू, गदा,बाण, वज्र, धनुष्य, कुंडिका, दंड, शक्ती, सुदर्शन चक्र इत्यादी धारण करणारी प्रसन्नवदना, कमलासना आणि महिषासूरमर्दिनी अशा महालक्ष्मीचे मी ध्यान करतो. कोलासूर दैत्यालाही श्रीमहालक्ष्मीने ठार मारले. शाक्त संप्रदायाचे उपासक श्रीमहालक्ष्मीची आराधना करतात. कोल्हापूर इथे श्रीमहालक्ष्मीचे मंदिर आहे.

श्रीमहासरस्वती
श्रीमहासरस्वती हे देवीचे एक रूप आहे. श्रीमहासरस्वतीने चंडमुड आणि शुंभ-निशुंभ राक्षसांना ठार मारले, तेव्हा सर्व देवांनी देवीची स्तुती केली. ती अशी- ‘हे देवी, तू अनंतपराक्रमी वैष्णवशक्ती आहेस. संसाराची आदिकारण देवता तूच आहेस. या तुझ्या मोहीत संसारातून तूच सोडवू शकतेस. सर्व विद्या तुझ्यातच सामावलेल्या आहेत. स्त्री हे तुझे रूप आहे. तू शत्रूपासून आमचे रक्षण कर.’
श्रीमहासरस्वती ही सत्त्वगुणी देवता आहे. शाक्त पंथातील ही देवता आहे. श्रीमहासरस्वती ही श्रीमहालक्ष्मीतूनच निर्माण झाली, ही श्वेत वर्णाची चतुर्भुज आहे. हिच्या हातात माला, अंकुश, वीणा आणि पुस्तक या वस्तू असतात. देवीच्या या रूपाला महतविद्या, महावाणी, भारती, आर्या, ब्राह्मी इत्यादी नावानी ओळखले जाते. श्रीविद्यार्णव तंत्रात हिचे वर्णन करण्यात आलेले आहे. ही देवता गौरीच्या शरीरातून निर्माण झाली. ही अष्टभुजा आहे. बाण, मुसळ, चक्र, त्रिशूल, शंख, नांगर, घंटा आणि धनुष्य ही आयुधे हिच्या हाती असतात.
घरातील स्त्रीच्या अंगी श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती यांचे गुण हवेत. त्यासाठी घरातील प्रत्येकाने मदत, सहकार्य करणे आवश्यक आहे. गुंडांशी, दुर्जनांशी सामना करण्याचे शरीर सामर्थ्य स्त्रीपाशी हवे, यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती तिला मिळावयास हवी. महालक्ष्मीप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्याचे ज्ञान तिला हवे, तसेच तिला उच्च शिक्षण मिळावयास हवे, तरच ती मुलांवर चांगले संस्कार करू शकेल. दुर्दैवाने होते काय की, दुर्गेच्या मूर्तीची पूजा आपण मोठ्या जोरात करतो, परंतु घरात २४ तास वावरणाºया खºया देवीकडे आपण दुर्लक्ष करतो. मंदिरातील देवीपेक्षाही घरातील देवता जास्त महत्त्वाची आहे.
 

Web Title: Day of preparation of the third gardener in front of the Goddess, worshiping Shri Mahakali, Shri Mahalakshmi, Shri Mahasaraswati Devi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.