मृत्यू आणि अध्यात्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:42 AM2019-08-28T05:42:53+5:302019-08-28T05:42:57+5:30
जेव्हा तुम्ही मृत्यू नाकारता तेव्हा तुम्ही जीवनसुद्धा नाकारता.
जेव्हा तुम्ही मृत्यू नाकारता तेव्हा तुम्ही जीवनसुद्धा नाकारता. मृत्यू ही काही अशी गोष्ट नाहीये जी तुमच्यासोबत भविष्यात घडणार आहे. जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा सोबत अर्धा मृत्यूही झाला. फक्त राहिलेला अर्धा भाग घडणं अजून बाकी आहे एवढंच. नि:शंकपणे एक दिवस ते पूर्ण होणार आहे. जीवन आणि मृत्यू या विभिन्न प्रक्रि या नाहीत. त्या आपसात एकमेकांत खोलवर
गुंतल्या आहेत. जीवन आणि मृत्यू या दोन्ही प्रक्रिया तुमच्या आत प्रत्येक क्षणी घडत आहेत. तुमची अवघी श्वसन क्रिया, तुम्ही आत घेत असलेला प्रत्येक श्वास म्हणजे जीवन आहे आणि बाहेर सोडलेला प्रत्येक श्वास हा मृत्यू आहे. जर तुम्ही पुढचा एक श्वास आत घेतला नाही म्हणजे तुम्ही मरण पावलात. जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा सर्वात पहिली गोष्ट तुम्ही केलीत ती म्हणजे प्राणवायू आत घेतलात आणि आयुष्यात तुमच्या हातून
सर्वात शेवटची केली जाणारी गोष्ट म्हणजे तुम्ही शेवटचा श्वास बाहेर सोडणार. आयुष्य निरंतर अनिश्चित आहे. मृत्यू मात्र शंभर टक्के निश्चित आहे, यात अजिबात शंका नाही. जीवनाबद्दल तुम्हाला लाखो शंका असू शकतात. ‘मी श्रीमंत होईन की नाही?’, ‘मी सुशिक्षित होईन की नाही?’, ‘मी आत्मज्ञानी होईन की नाही? वगैरे’. पण मृत्यूबाबत मुळीच कोणतीही शंका नाहीये. तर मग निश्चित, अटळ गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टींचं ओझं डोक्यावर ठेवून बसण्यात काय अर्थ आहे? आध्यात्मिक प्रक्रिया तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही मर्त्य आहात याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही देवाचा विचार करत आहात म्हणून तुम्ही आध्यात्मिक होत नाही. तुम्ही ईश्वराचा शोध घेता कारण तुम्हाला खूश राहायचं आहे किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय नीट चालवायचा असतो किंवा तुम्हाला स्वर्गात जायचं असतं. कारण तुमचं आयुष्य तुम्ही नरक बनवलंय म्हणून. आपण मर्त्य आहोत याची जाणीव झाल्यावरच तुम्ही आध्यात्मिक बनता.
- सद््गुरू जग्गी वासुदेव