ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:56 AM2019-11-16T04:56:29+5:302019-11-16T04:56:37+5:30
मनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो.
- ब्रह्माकुमारी नीता
मनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो. माणसाला सामाजिक प्राणी मानले जाते. समाज, कुटुंब, प्रकृती अशा अनेक बाबींबरोबर मनुष्याला ऋणानुबंध आहेत. संपूर्ण जीवनच त्या अनुषंगाने चालत आहे. एखादे मूल जन्माला आले की हळूहळू त्याच्यावर मातृऋण, पितृऋण वाढत जातात. हे ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात. कारण हे बांध आपल्याला जीवनाच्या प्रवाहामध्ये कुठे ना कुठे थांबवतात. जोपर्यंत त्याची भरपाई होत नाही तोपर्यंत आपली अजिबात सुटका नाही. आपण सर्वच पावलोपावली अनुभव घेत असतो की कोणतेही बंधन आपल्याला आवडत नाही. परंतु ही बंधने मनाला तसेच आपल्या पूर्ण जीवनाला प्रभावित करतात. सगळ्यांनाच आपल्या मनासारखा जीवनसाथी, नोकरी, कुटुंब मिळत नाही. काही ठिकाणी तडजोड करूनच जीवन व्यतीत करावे लागते. म्हणजेच हे बंध असे आहेत ज्यांनी आपले जीवन बांधून ठेवले आहे. पण सत्य हे आहे कीहे बांध कदाचित आपणच घातले आहेत. कळत नकळत केलेले विचार, बोल, कृती याचाच तो परिणाम आहे. आजच्या युगात ‘गिव्ह अॅण्ड टेक’ या नियमावर लोक चालत आहेत. कदाचित आपण त्याला आज व्यवसाय म्हणतो. प्रत्येक संबंधामध्ये, मग ते पती-पत्नी, भावंडं, मित्रमैत्रिणी, वडील-मुलगा, चालक-मालक असो. सगळीकडे मी किती केलं आणि त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीने किती केलं याचा हिशेब लावला जातो. कधी कधी आपण बोलून दाखवत नाही, पण मनातल्या मनात तो हिशेब करण्याची प्रक्रिया सुरूच राहते. अनेकदा ती अव्याहत सुरू असते. काही वेळा तर आपण स्वत:चीच समजूत घालतो की जाऊ दे, कदाचित हे पूर्वजन्माचं देणं असेल जे आज आपण फेडत आहोत. कळत नकळत आपल्याला आपल्या कर्मांचं गूढ लक्षात येतं.