ऋण मोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 04:05 AM2018-07-31T04:05:43+5:302018-07-31T04:06:10+5:30
भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे.
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय
भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे. म्हणूनच मानवाकडूनही अशी अपेक्षा केली जाते की त्याने स्वत:ला पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व ठेवले पाहीजे व शेवटी त्या परमशक्तीमध्ये लीन झाले पाहीजे. जेव्हा लहान मूल जन्माला येते, तेव्हा ते पूर्णत: शुद्ध व निष्पक्ष असते. परंतु जसजसे ते मोठे होत जाते तसतसे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होत जातात. तो कुठल्यातरी विशेष वर्ग किंवा सिद्धांताशी जोडला जातो. म्हणूनच प्रत्येक मानवावर हे ऋण असते की त्याने आपले मन शुद्ध व निष्पक्ष ठेवले पाहिजे. या विश्वातील प्रत्येकच धर्म मानवाला या दिशेने चालण्याची प्रेरणा देतो व अनेक विधीसुद्धा सांगतो.
ब्रह्मऋणानंतर देवऋणाचे स्थान आहे. देव निसर्गातील वेगवेगळया शक्तीचे प्रतिनिधित्व करतात, जसे की ते ऊन, थंडी, पाऊस व विश्वातील इतर गतिविधींचे संचालन करतात. या शक्ती चांगले काम कशा करतील, यासाठी मानवाने या शक्तींना चालना देण्याचे कार्य करायला पाहिजे. पर्यावरणाची सुरक्षा असो वा निसर्गातील अनेक अनुकूल गोष्टींना चालना देण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
देवऋणानंतर ऋषीऋणाचे स्थान आहे. आपल्या ऋषी, मुनींनी आपले ज्ञान व विज्ञानाद्वारे या विश्वाला समृद्ध केले आहे. या आधुनिक जीवनात जे काही विकसित झाले आहे, ते ऋषी, मुनी, वैज्ञानिक, नेता, समाजशास्त्रज्ञ इ. च्या ज्ञानाचे फलित आहे.
सर्वात शेवटी ज्या ऋणाचे वर्णन पाहायला मिळते, ते म्हणजे पितृऋण. आपल्याला माता-पित्यांकडून जन्म मिळतो. आपले सर्व संस्कार, जीवन जगण्याची कला मूलत: आपण आपल्या आई-वडिलांकडून शिकत असतो.
अशाप्रकारे आपले संपूर्ण जीवन या चार प्रकारच्या ऋणांवर आधारित आहे. या ऋणांची परतफेड करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. परंतु आपले व्यस्त जीवन, स्वार्थ व षड्दोषांच्या अस्तित्वामुळे मानव या ऋणांना पूर्णत: विसरलेला आहे. यामुळे मानवाचे व्यक्तिगत, सामाजिक व राष्ट्रीय जीवन अत्यंत कष्टमय झालेले आहे. शेवटी आपण आत्मशुद्धीद्वारे ब्रह्मऋण, पर्यावरणाच्या उपासनेद्वारे देवऋण, ज्ञान-विज्ञानाच्या अर्जनाद्वारे ऋषीऋण व माता-पित्यांच्या सेवेद्वारे पितृऋण फेडून सफल किंवा पूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो.