म्हणोनिया शरण जावे । सर्व भावे देवासी ॥
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 08:20 PM2019-06-06T20:20:04+5:302019-06-06T20:22:33+5:30
देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे परम कल्याण होणार नाही.
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी
अध्यात्म मार्गात देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे कल्याण होत नाही. तुकाराम महाराज आग्रहाने सांगतात -
म्हणोनिया शरण जावे । सर्व भावे देवासी ॥
फक्त महाराजच सांगतात असे नाही तर गीता माऊली देखील म्हणते -
तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत ।
देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे परम कल्याण होणार नाही. जीवाने अत्यंतिक दु:ख निवृत्तीकरिता आणि परमानंदाच्या प्राप्तीकरिता देवालाच शरण जायला पाहिजे. शरण तरी का जायचं..? तर गीता माऊली म्हणते -
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपध्यन्ते माया मेतां तरिन्त ते ॥
भगवान म्हणतात, जे मला शरण येतात ते माया नदी तरुन जातात. आता देवाला शरण तरी कसे जावयाचे..? तर महाराज म्हणतात, सर्व भावे..!
ज्ञानेश्वर महाराज हे सर्वभावे या पदाचे स्पष्टीकरण करतात -
तया अहं वाचा चित्त अंग । देऊनिया शरण रिघ ॥
महोदघी का गांग । रिघाले जैसे ॥
गंगेचं पाणी आपल्या जवळचं सर्वस्व अर्पून जसं समुद्रात मिसळतं तसं आपल्या जवळील सर्वस्व देवाला अर्पण करावं. सर्वस्व म्हणजे काय..? तर अहं..! म्हणजे अहंकार हा अर्पण करता आला पाहिजे. परमात्मस्वरु पात तो स्थिर करता आला पाहिजे. मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी प्राण आहे, असं न म्हणता मी वासुदेव तत्वता या भूमिकेवर आलात तर अहंकार जाईल. अहं ब्रह्मास्मि ही ब्रह्मरु पता सिद्ध व्हावी लागेल नंतर शरणागतीसाठी दुसरे समर्पण आहे. वाचा..! तुकाराम महाराज म्हणतात -
तुका म्हणे वाचा वाहिली अनंता ।
बोलायचे आता काम नाही ॥
वाचा समर्पण करता आले पाहिजे. मुखाने फक्त भगवंताचेच नाम घेणे. हरि बोला हरि बोला, नाही तरी अबोला. साधकाला असं जीवन जगता आलं पाहिजे. तिसरं समर्पण आहे चित्ताचं. चित्त देवाला देणे म्हणजे आपले अंत:करणसुद्धा देवालाच समिर्पत करता आले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात -
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही ॥
धरोनिया बाही भव हा तारी दातारा ॥
देवाचे चरणकमल ह्रदयात सर्व काळ धारण करणे. याला चैत्तीक शरणागती असे म्हणतात आणि शेवटची शरणागती सांगितली आहे अंग. शरीर देवाला समर्पण करावे लागेल. मनासहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥
यालाच सर्वभावाने शरण जाणे असे म्हणतात. शरणागतीत मी देवाचाच आहे असा भाव असावा मगच तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा..!
( लेखक हे स्वत: राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. 9421344960 )