समर्पित योगगुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:30 PM2019-07-09T15:30:29+5:302019-07-09T15:31:28+5:30
समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली...
- पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती-
डॉ. संप्रसाद विनोद यांच्यासारख्या महान व्यक्तीबद्दल लिहिण्याचा आलेला योग हा मला भाग्याचा क्षण वाटतो आहे. त्यांचे वडील महर्षी विनोद यांची अध्यात्मिक परंपरा आणि मोठा वारसा त्यांच्याकडे आला आहे. तो त्यांनी जपला आणि वृद्धिंगत केला आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात १९६९ ते ७१ मध्ये ते माझे विद्यार्थी होते. माझा हा विद्यार्थी मला खूप वेगळा वाटायचा. त्यामुळे, त्याच्याकडे माझं लक्ष जायचं. ते खूप चिकित्सक होते. सर्वांगीण विचार करून प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन अभ्यास करणं आणि आपली उन्नती साधण्याची प्रवृत्ती त्यांच्यात दिसायाची. एम.बी.बी.एस. झाल्यावर ते इतरांप्रमाणे एम.एस./एम.डी. करतील असे वाटले होते. पण, त्यांनी वेगळीच दिशा घेतली. ते योग आणि अध्यात्माकडे वळले. त्यातच स्वत:ला वाहून घेतलं.
समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली. पत्नी डॉ. ऋजुता व योगसाधकांच्या सहकार्याने महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनची (एम.व्ही.आर.एफ.) स्थापना केली. योगविद्येचा सर्व स्तरातील आणि वर्गातील लोकांना कसा लाभ करून देता येईल यावर सखोल विचार केला. चिंतन केलं. आपली योगसाधनाही नियमित सुरू ठेवली. योगासनांमधे शरीर आणि मन जोडले जाते हा अनुभवसिद्ध विचार घेऊन अध्यात्मिक विकास आणि सामाजिक विकासकार्याची सुरुवात केली. स्वानंद सहजयोग साधना आणि शवासन-ध्यान याबद्दलचे त्यांचे संशोधन जगात मान्य झाले आहे. मला सांगायला विशेष आनंद वाटतो, की एके काळी जो माझा विद्यार्थी होता, त्याचाच आता मी विद्यार्थी झालो आहे. मी त्यांना माझे गुरू मानतो.
गेल्या चार दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी लोकांना योगाच्या उपयुक्ततेची अतिशय प्रभावीपणे जाणीव करून दिली. तरुण वयात अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्याचा परवाना (ग्रीन कार्ड) मिळालेला असूनही आपल्या देशवासीयांसाठी ते भारतात परत आले आणि शांती मंदिर या त्यांच्या वास्तूमधून योगविषयक ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू केले. हे सर्व करत असताना त्यांनी आपलं साधेपण हरवलं नाही. गावोगावी आणि विदेशी जाऊन, भाषणे देऊन, कार्यशाळा घेऊन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन समाजप्रबोधन केलं. आजही करीत आहेत. त्यांचं हे काम असंच चालू राहो आणि त्याची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्या खूपखूप शुभेच्छा!! (लेखक ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)