अध्यात्मातील परिभाषा संतांच्या आचरणातून प्रकटते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 07:50 AM2019-06-10T07:50:57+5:302019-06-10T08:03:43+5:30

मनुष्याच्या मनाचे प्रवृत्तीवर, विचारप्रणालीवर, उपासनापद्धतीवर आणि अनुसरलेल्या साधनेच्या विशिष्ट पद्धतीवर अस्तित्व ठरत असते.

The definition of spirituality manifested through the conduct of saints | अध्यात्मातील परिभाषा संतांच्या आचरणातून प्रकटते

अध्यात्मातील परिभाषा संतांच्या आचरणातून प्रकटते

Next

मनुष्याच्या मनाचे प्रवृत्तीवर, विचारप्रणालीवर, उपासनापद्धतीवर आणि अनुसरलेल्या साधनेच्या विशिष्ट पद्धतीवर अस्तित्व ठरत असते. उदा. ज्ञानदेवांच्या ठायी ईश्वरी अस्तित्वाचे भान कोणत्या स्वरूपाचे होते, हे समजून घेणे म्हणजे ज्ञानदेव समजणे होय. संत ही निरनिराळे असतात; परंतु विविध प्रवृत्तींनी व वैशिष्ट्यांनीयुक्त असतात. सर्व संतांच्या ठिकाणी ईश्वरी अस्तित्वाचे भान असते. समग्र विश्वाच्या रूपाने नटलेल्या विश्वकर्त्याच्या मनाने सततचे अनुसंधान राखून त्याच्या प्रकाशात आपले सर्व व्यवहार संत करत असतात. संत आध्यात्मिक अनुभवाने संपन्न साक्षात्कारी पुरुष असतात. संतांची वाणी-मन, आचरण या सर्वांतून अध्यात्म प्रकट होत असते. अध्यात्मातील परिभाषा संतांच्या आचरणातून लक्षात येते. ऐहिक जगातील कोणतीही कामना त्यांच्या चित्ताला स्पर्श करू शकत नाही. ते पूर्ण विरक्त आणि निवृत्त असतात, लोककल्याणार्थ कर्म करीत असतात. त्यांच्या त्यागामागची भूमिका लक्षात घ्यावी लागेल. संतांचे अस्तित्व जाणून घेण्यासाठी शब्दसौंदर्याच्या पिसाऱ्याच्या पलीकडे जावे लागते. त्यांच्यातले अनन्यसाधारणत्व समजून घेतले पाहिजे.

संतांना परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल त्यांच्या चित्ताची स्थिरता डगमगत नाही. सात्त्विकतेची निर्मळ मूर्ती म्हणजे संतत्व होय. महापुरुषाचे मन जाणिवेच्या पातळीवर समजून घेतले पाहिजे. आविष्काराच्या पडद्याआड लपलेल्या आशयापर्यंत पोहोचल्याशिवाय संतांचे अलौकिकत्व कळत नाही. संतांच्या मनाची प्रसन्नता जगातल्या दु:खांना नाहीशी करत असते. दया, क्षमा, शांतीचा वास त्यांच्या हृदयात असतो. संत जीवन जगोद्धारासाठी आहे. मनाची मलिनता संतांच्या संपर्कात येण्याने जाते. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी जगाचे पाप-ताप नाहीसे करते तेच संतांच्या सहवासात आल्यास आपली मनोवृत्ती बदलत असते. खऱ्या भक्तिसुखाचा आनंद उपभोगता येतो. सुखाशी गाठ बांधता येते. आपल्याला हवं असलेलं सुख संत सहवासात मिळते. आत्मस्वरूपाच चिंतन करून ‘मी’पणाची ओळख होते. संतांच्या सहवासातून मानवी मूल्यांचे आकलन होते. संताचे आणि मानवी मनाचे विश्लेषण यात फरक आहे. संताचे मन झऱ्यासारखे आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

Web Title: The definition of spirituality manifested through the conduct of saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.