परमेश्वराची प्राप्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 03:50 AM2019-04-27T03:50:26+5:302019-04-27T03:51:38+5:30
परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, परमेश्वरी अस्तित्वाविषयी दृढ विश्वास आणि ज्ञानभारला विवेक याची साधक भक्ताला नितांत आवश्यकता आहे.
- वामनराव देशपांडे
भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला श्रद्धेय साधकांची मनोवृत्ती समजावून सांगताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिला की, परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, परमेश्वरी अस्तित्वाविषयी दृढ विश्वास आणि ज्ञानभारला विवेक याची साधक भक्ताला नितांत आवश्यकता आहे. हे गुण साधकापाशी नसतील तर तो साधक नामसाधनेला आणि शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीला अपात्र ठरतो. विवेकहीन माणसाला भगवंत अस्तित्वसुद्धा जाणवत नाही, तर भगवंताची प्राप्ती कशी काय होणार-भगवंत अर्जुनाला अश्रद्धेय माणसांविषयी सांगतात की,
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: ।। गीता:४.४0।।
‘पार्था, ज्याच्यापाशी कोणताही विवेक नाही, भगवंताविषयी कोणतीही श्रद्धा नाही, जो मूलत: संशयी वृत्तीचा आहे, त्याचा मानवी जन्म व्यर्थ आहे. प्रत्येक क्षणी त्याचे पतन होत असते. वैकुंठप्राप्ती अशा अश्रद्धेय माणसांना कधीच होत नाही. स्वर्गलोकीचे दुरूनही दर्शन घडत नाही. इतकेच काय, परंतु हा मृत्यूलोकही त्यांना हितकारक ठरत नाही. कुठल्याही प्रकारच्या सुखाचा, या संशयग्रस्त अश्रद्धेय जीवांना साधा स्पर्श होत नाही. याचे एकच महत्त्वाचे कारण म्हणजे मनात ठाण मांडून बसलेली ही संशयी वृत्ती, देहभावनेने जगणे, श्रद्धाविहिन कृती, विवेकाचा पूर्ण अभाव, मर्त्य विचार करण्याची पद्धती, त्यांना परमेश्वरी शक्तीची अजिबात ओढच निर्माण करीत नाही. भगवंत संपूर्ण जीवसृष्टीचे सुहृद म्हणजे अत्यंत प्रेमळ मित्र आहेत. सखा आहेत. जो भक्त परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून व्याकुळ होतो, त्या जीवाचा भगवंत सांभाळ करतो, त्याचा योगक्षेम परमेश्वरच सांभाळतो. त्याच्या जीवनाचा उद्धार होतो.
अशा व्याकुळ परमभक्ताच्या मनात जर काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत: त्या शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकुळ परमभक्त असतो ना, त्याच्या हातून एक चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते, ती अशी की, तो जेवढे जाणतो, त्याच्या मर्यादित बुद्धीला जेवढे झेपेल तेवढेच सत्य आहे अशी त्याची समजूत होते. त्याचा अभिमान त्या साधक भक्ताला होतो. तो त्या भक्ताच्या पतनाचा क्षण ठरतो. म्हणून भगवंत स्वत: आपल्या भक्ताचे अज्ञान दूर करतो. भगवंत अर्जुनाला या अज्ञानमयी क्षणांच्या समाप्तीचा मार्ग सांगतात.
तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञघनासिनात्मन:।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ।।गीता:४:४२।।
‘पार्था, केवळ अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या, आपल्या अंत:करणात घट्ट रूतून बसलेल्या संशयाला, हातात आपण ज्ञानरूपी धारदार तलवार घेऊन, या अज्ञानाने माखलेल्या संशयाला नष्ट केले पाहिजे, तरच चित्तात समत्व नांदायला सुरुवात होईल. हाच सर्वोत्तम योग आहे. एकदा का चित्त स्थिर झाले की, तू युद्ध करायला सिद्ध होशील. पार्था, कर्मयोगी पुरुषच संशयात्मा नष्ट करू शकतो.’