भक्त म्हणजे विभक्त नव्हे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 07:30 PM2020-01-04T19:30:06+5:302020-01-04T19:32:08+5:30
भक्ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी नितांत समर्पण शील प्रेम. भक्त कधी देवा पासून वेगळा राहूच शकत नाही.
- हभप भरतबुवा रामदासी ( बीड )
देवर्षी नारद महाराज भक्तीचे लक्षण सांगतांना म्हणाले;
" नारदस्तु तद् अर्पिता अखिलाचारता तद् विस्मरणे परम व्याकुलता इति. ....!
अखिल आचार भगवंताला अर्पण करणे म्हणजेच भक्ती. भक्ताचे आणखी एक लक्षण म्हणजे, ' तद् विस्मरणे परम व्याकुळता. ..! भक्ताच्या अंतःकरणात भगवद् दर्शनाची तीव्र अभिलाषा असावी. ही व्याकुळता, आतुरता, अगतिकता, ओढ किती असावी. .? पाण्याबाहेर काढलेली मासोळी जशी पाण्यासाठी व्याकुळ होते ती व्याकुळता. एखादी अभिसारिका आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी किती अधीर होते ती अधीरता. भक्ताच्या ठिकाणी अशी अधीरता निर्माण झाल्याशिवाय सगुण साक्षात्कार शक्यच नाही. भक्ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी नितांत समर्पण शील प्रेम. भक्त कधी देवा पासून वेगळा राहूच शकत नाही. जो विभक्त रहातो तो भक्त नाही. समर्थ म्हणतात;
भक्त म्हणजे विभक्त नव्हे! विभक्त म्हणजे भक्त नव्हे! विचारेविण काहीच नव्हे! समाधान!!
मी भक्त ऐसे म्हणावे! आणि विभक्तपणेचि भजावे! हे अवघेचि जाणावे! विलक्षण!!
भक्ती मार्ग सहज सुलभ असला तरी, त्यात संपूर्ण शरणागती, श्रद्धा, निष्ठा भाव, विश्वास, प्रेम, अनन्यता, अनासक्ती, व्याकुळता इ.लक्षणांचा अंतर्भाव असेल तरच भक्ती मार्गातून आत्मसाक्षात्कार घडतो. भक्तीच्या प्रांगणात कृष्ण दर्शनासाठी व्याकुळ झालेली राधा, गिरीधर गोपाळा साठी विष प्राशन करणारी मीरा, कालिमातेच्या दर्शनासाठी रात्रंदिन तळमळणारे रामकृष्ण परमहंस,
भेटीलागी जीवा लागलीसे आस!
पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ..
असे म्हणत देहूच्या डोंगरावर अगतिक झालेले तुकोबा, हीच मंडळी भक्ती मार्गातील सर्वोच्च आदर्श आहेत. साधक या अवस्थेला गेला तरच " भक्तीचेनि योगे देव! निश्चये पावतो मानव!! या समर्थ वचनाचा प्रत्यय येईल व भक्ती मार्गाच्या पंथातून मुक्तीचे द्वार खुले होईल.
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )