भाविकांचे श्रद्धास्थान : मायंबा गडावरील मच्छिंद्रनाथ समाधी

By अनिल लगड | Published: April 5, 2019 05:01 PM2019-04-05T17:01:25+5:302019-04-05T17:02:18+5:30

अनिल लगड अहमदनगर - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. या समाधीच्या ...

Devotees of the devotees: Machhindranath Samadhi on Maynaba fort | भाविकांचे श्रद्धास्थान : मायंबा गडावरील मच्छिंद्रनाथ समाधी

भाविकांचे श्रद्धास्थान : मायंबा गडावरील मच्छिंद्रनाथ समाधी

googlenewsNext

अनिल लगड
अहमदनगर - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते. यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते. त्यामुळे देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त हा लेख.
अहमदनगर बीड जिल्ह्याच्या गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवनाथांचे वास्तव्य होते. त्यापैकी नगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ, आष्टी (जि. बीड) तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. कारखेल परिसरात आडबंगीनाथ, मिरावली पहाडावरील मिनीनाथ, जानपीर येथे जालिंदरनाथ, हिवरा येथील रेवननाथ (रोडागिरी) असे सर्वच नाथांचे वास्तव्य दिसून येते. हे नवनाथांच्या ग्रंथातून सिध्द झाले आहे. मायंबा येथील मच्छिंद्रनाथांचा यात्रौत्सव पाडव्याच्या दिवशी सालाबादप्रमाणे असतो. या दिवशी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदा उघडली जाते. तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभरपैकी ‘नऊ नारायण’ म्हणून प्रसिध्द असलेल्या नऊ मुलांनी जगदोद्धारार्थ अवतार धारण केले. त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ होत. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला. ‘श्री मत्स्येंद्र’ हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या ‘कौलज्ञाननिर्णय’ नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. सिद्ध परंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्ती चळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाºया नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.
जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होत. विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती, भिल्लीणीच्या रुपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय. असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वत:च्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषिश्रेष्ठ, स्वामी मच्छिंद्रनाथ होत.
मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला, त्यात त्यांनी पृथ्वी, तेज, आप, वायू व आकाश अशी रुपे धारण केली. तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळून काढले पण त्यांना स्वामी मच्छिंद्रनाथ सापडले नाहीत, अशी अख्यायिका मच्छिंद्रनाथांची आहे.
नवनाथांपैकी आद्यगुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर मायंबा (सावरगाव, ता. आष्टी, जि. बीड) या ठिकाणी आहे. नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो. नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात. तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिध्द आहे. श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजेच सावरगांव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते. याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करीत आहे असे वाटते. भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तिच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो. गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे. तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे. ही देवी नाथांनी मानलेली बहीण आहे. गडावर अखंड धुनी असते ती कधीच विझत नाही. धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे. त्याला ‘देव तळे’ (तलाव) म्हणतात. गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मढी ते मायंबा नवीन रस्ता झालेला आहे. मायंबा (सावरगाव) येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्याबाहेरुन हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त व पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते. आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला अंघोळ घातली जाते. त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो. या चंदनाचा सुगंध परिसरात दरवळतो. समाधी उघडी असल्याने पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते. पुरुषांनाही स्नान करुनच समाधी दर्शन दिले जाते. कावडीने पाणी घातल्यानंतर रात्री बारा वाजेनंतर समाधी दर्शनासाठी खुली केली जाते. त्यानंतर पाडव्याच्या पहाटे पाच वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते. ती पुन्हा पुढच्या पाडव्याला उघडली जाते.
यंदा यात्रेनिमित्त भाविकांच्या स्नानासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे केली आहे. यात्रेसाठी ट्रस्टतर्फे दर्शनरांग, पिण्याचे पाणी, पोलीस बंदोबस्ताची सर्व तयारी केली आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के यांनी केले आहे.
 

Web Title: Devotees of the devotees: Machhindranath Samadhi on Maynaba fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.