देवाविना भक्त दिसे रिकामा । भावाविना देव नयेचि कामा ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 02:11 PM2020-04-18T14:11:19+5:302020-04-18T14:29:51+5:30

ईश्वर प्राप्तीसाठी साधक जी काही साधना करीत असेल त्या साधनेत भाव हा हवाच..! भावातच तर खरं ईश्वराचं अस्तित्व दडलेलं आहे.

Devotees without God is empty. There should be no God without a dedication. | देवाविना भक्त दिसे रिकामा । भावाविना देव नयेचि कामा ॥

देवाविना भक्त दिसे रिकामा । भावाविना देव नयेचि कामा ॥

Next

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

भाव असल्याशिवाय त्या साधनेला किंमत नाही
अध्यात्मशास्त्रात साधकाच्या अंत:करणांत जसा भाव असेल तसा ईश्वरी सत्तेचा अनुभव त्याला येतो. भाव अनन्य साधारण, दृढ असेल तर अशा भक्ताची देव कधीही उपेक्षा करीत नाही. ईश्वर प्राप्तीसाठी साधक जी काही साधना करीत असेल त्या साधनेत भाव हा हवाच..! भावातच तर खरं ईश्वराचं अस्तित्व दडलेलं आहे. साधनेमध्ये भावाचाच अभाव असेल तर भगवंताचा प्रभाव कधीही प्रत्ययास येणार नाही..! 

सुभाषितकार म्हणतात -
न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये ।
भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम् ॥

ईश्वरी अस्तित्व हे काही फक्त लाकूड, पाषाण, मृत्तिका एवढ्यापुरते मर्यादित नाही तर साधकाच्या भावातच देव आहे. भक्तीशास्त्रात भावाला नितांत महत्व आहे. मुक्तीचा आत्मा आहे भक्ती आणि भक्तीचा आत्मा आहे भाव..! भक्तीशिवाय मुक्ती नाही हे जितकं खरं तितकंच भावाशिवाय भक्ती नाही हे ही तितकेच खरं..! आमची ज्ञानराज माऊली म्हणते -

भक्ती एक जाणे । तेथे साने थोर न म्हणे ॥
आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥

भावविरिहत साधनेची किंमत शून्य आहे. भावाशिवाय भक्ती ही निष्प्रभ आहे. वामनपंडित म्हणतात -

शून्याविना अंक दिसे रिकामा । अंकाविना शून्य नयेचि कामा ॥
देवाविना भक्त दिसे रिकामा । भावाविना देव नयेचि कामा ॥

गणिती शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे शून्याच्या मागे एखादा अंक असल्याशिवाय त्या शून्याला किंमत नाही त्याप्रमाणे भक्ती साधनेत भाव असल्याशिवाय त्या साधनेला किंमत नाही. वरील सर्व विवेचनावरुन आपल्या सहज लक्षात येईल की, साधनेत, भक्ती शास्त्रात भावाला किती अनन्य साधारण महत्व आहे.
आता आपण म्हणाल की, भक्तीत भाव हवा हे खरं पण हा भाव म्हणजे तरी नक्की काय..? तर याचे चिंतन आपण आपल्या पुढील लेखांकात पाहूया..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत,त्यांचा भ्रमणध्वनी  8793030303 )

Web Title: Devotees without God is empty. There should be no God without a dedication.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.