भावभक्ती आणि कृतिभक्ती

By appasaheb.patil | Published: October 18, 2019 07:49 PM2019-10-18T19:49:41+5:302019-10-18T19:49:48+5:30

आपले जीवनही आज गोल गोल फिरत आहे.

Devotion and devotion | भावभक्ती आणि कृतिभक्ती

भावभक्ती आणि कृतिभक्ती

Next

भावभक्ती आणि कृतिभक्ती ही मानवाच्या जीवन नौकेची दोन वल्ही आहेत. ही दोन्ही वल्ही चालवली, तर ती नाव पुढे जाईल. यातले एकच वल्हे चालवले आणि दुसरे चालवलेच नाही तर काय होईल ? नाव पुढे जाते आहे असे वाटेल, पण प्रत्यक्षात ती गोल गोल फिरेल! आपले जीवनही आज असे गोल गोल फिरत आहे.

आपल्याला ही दोन्ही वल्ही मारायला शिकायला हवे. भावभक्ती आणि कृतिभक्ती ही परस्परपूरक आहेत. भक्तीची बैठक ठेवून केलेल्या कृतीतून भाव खुलतो, भक्तिरस जागृत होतो. भावपूर्णता येते, भाव गतिमान झाला की, चित्त एकाग्र होते. त्यातून परत कृतीची प्रेरणा मिळते. हे दोन्ही करत करत हळूहळू चित्तशुद्धी होत जाते व माणूस परिपूर्ण बनतो.

भक्ती माणसामध्ये दोन शक्ती आहेत. क्रियाशक्ती आणि भावशक्ती या दोन्ही शक्ती सतत भोगासाठी वापरल्या जातात. या शक्तींमागे आपली भोगासक्ती काम करत असते. भोगासक्ती काय करते ? क्रियाशक्ती आणि भावशक्ती या दोहोंना मारून टाकते. शरीर आणि मन लवकर म्हातारे बनते. त्यावेळी कळते की , भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता! मी भोग भोगतो आहे , या कल्पनेत जगत होतो ,पण भोग आहे तिथेच आहेत. मी मात्र त्या भोगांकडूनच भोगला गेलो !

माझ्या सगळ्या शक्ती त्यातून क्षीण झाल्या. क्रियाशक्ती आणि भावशक्ती यांच्यामागे आपण ' भोग ' ठेवला आहे. त्याऐवजी ' भक्ती ' ला ठेवले, तर या दोन्ही शक्ती वाढतात, जीवनात जोम आणि जोश येतो. म्हणूनच भक्तीची दोन अंगे आहेत. भावभक्ती आणि कृतिभक्ती आपल्या कृतीमागे भक्तीची बैठक आणून तशी कृती करणे ही कृतिभक्ती. क्रियाशक्तीला ही भक्ती चालना देते. आपले जीवन जो चालवतो , जो आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतो , त्या देवाबद्दलचा भाव वाढवून त्यात मन एकाग्र करणे म्हणजे भावभक्ती. मुर्तीपूजा ही भावभक्ती आहे.  
- ह. भ़. प सुखदेव धारेराव महाराज, सोलापूर

Web Title: Devotion and devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.