श्रद्धेची सुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:30 AM2019-03-04T05:30:31+5:302019-03-04T05:30:41+5:30
आषाढाच्या प्रथम दिवसीय पहिलेच आभ्र सहस्रावधी धारांनी धोऽऽ धोऽऽ कोसळावे आणि नदी-नाल्यांनी आपले वैराग्य सोडून आपल्याच मस्तीत तुडुंब भरून वाहायला लागावे
- प्रा. शिवाजीराव भुकेले
आषाढाच्या प्रथम दिवसीय पहिलेच आभ्र सहस्रावधी धारांनी धोऽऽ धोऽऽ कोसळावे आणि नदी-नाल्यांनी आपले वैराग्य सोडून आपल्याच मस्तीत तुडुंब भरून वाहायला लागावे व मानवी मनात प्रसन्नतेचा अंकुर अंकुरावा तसेच आहे. माणसाच्या मनातील श्रद्धेचे जे सर्वभैव अशक्य आहे त्याला शक्य करून दाखविण्याचे अद्वितीय कार्य मनात फुलणारी श्रद्धासुमने करतात म्हणून जीवनाची वेल हिरवीगार करण्यासाठी अन् त्यावर विवेकाचा मोगरा फुलण्यासाठी एखाद्या सिद्धांतावर वा विचारावर, एखाद्या महान व्यक्तित्वावर, सुपर नॅचरल पॉवरमधील एखाद्या घटकावर, काहीच नाही जमले तर आपल्या कामावर आणि घरादारावर तरी श्रद्धा असायलाच हवी म्हणजे घरे उद्ध्वस्त होणार नाहीत. श्रद्धेला तर्क-वितर्काच्या चिमटीत कधी पकडता येत नाही, जसे मलयगिरीवरून वाहणाऱ्या सुगंधी वाऱ्याला कधी गाळून घेता येत नाही. फुले गुंफून त्यांची सुंदर माळ तयार करता येईल; पण फुलांचा सुगंध गुंफ ता येत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही आणि गगनाला गवसणी घालता येत नाही. मनामनात प्रवाहित होणाºया ईश्वरी शक्तीविषयी अथवा निसर्गशक्तीविषयीच्या श्रद्धाभावांचे अगदी असेच आहे. ज्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
मलयानीक षीत नीळू । पालवी नयें गाळू
सुमनांचा परिमळू, गुंफलिता नये।
तैसा जाणा सर्वेश्वरू म्हणो नये सान थोरू
त्याच्या स्वरूपाचा निधीरु कवण जाणें।