भक्तीला ज्ञान व वैराग्याची साथ हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 04:53 PM2018-10-13T16:53:52+5:302018-10-13T16:56:41+5:30
मानवाचे मन सुखाचा शोध घेण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते. या मानवी मनाची सर्वश्रेष्ठता समजून घेण्याचा प्रयत्न अनेक श्रेष्ठ विभूतींनी केला.
- धर्मभूषण ब्रह्मेशानंद स्वामी
मानवाचे मन सुखाचा शोध घेण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते. या मानवी मनाची सर्वश्रेष्ठता समजून घेण्याचा प्रयत्न अनेक श्रेष्ठ विभूतींनी केला. भक्ती, देव, जन आणि संसार म्हणजे काय ? यांचे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला हवे .साधू संतांनी लिहून ठेवले आहे. हरिची भक्ती केली, हरिभक्तीत विश्वास ठेवला तर अलौकिक अशी किमया घडू शकते. आत्मस्वरूपाची ओळख घडते.
महान सत्पुरुषांनी हरिभक्ती केली, त्यात कृष्णावतारामध्ये आपली भक्ती भगवान गोपाळकृष्ण यांच्या चरणी समर्पित करणारा उद्धव, प्रभु श्री रामचंद्राचा सेवक अंगद आणि विठ्ठलाच्या ठिकाणी आपली भक्ती समर्पित करणारा संत नामदेव यांचा उल्लेख करता येईल. एकापेक्षा एक सरस जन्म घेऊन अशा महान सत्पुरुषांनी निःस्वार्थ अशी भगवंत भक्ती केली म्हणून आजही त्यांची नावे घेतली जातात. ती सार्थ आहेत.
भगवंताची लीला अगाध आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांची भक्ती करावी. एक लक्षात ठेवा भक्तीला कुविचारांचा विकल्प स्पर्श करुच शकत नाही. प्रत्येकाच्या हृदयात भक्ती वास करू शकते. तिला परमेश्वराने निर्माण केली आहे. आणि तिच्या बळावर परमेश्वर माणसांच्या अंतःकरणात राहू शकतो. एवढा या भक्तीचा महिमा आहे. भक्ती ही अशी आहे, मात्र तिला ज्ञान व वैराग्य याची साथ हवी. ती नसेल तर त्या भक्तीला काही अर्थ नाही.
जो भक्त प्रत्येक गोष्ट भगवंताला विचारून करतो, त्याचा संसार भगवंताच्या पूर्ण कृपेने चांगला चालतो. मग संसार सुखी करायचा असेल तर इतरांचे गुण ,सद्गुण बघता आले पाहिजेत. ती हातोटी आपल्यामध्ये श्रीकृपेने आली पाहिजे. आपल्यामध्ये सद्गुण जर असेल तर दुर्गुण आपणहून पळून जातात.सद्गुणांच्या प्राप्तीनंतर मनुष्य खऱ्या अर्थाने मनुष्य बनतो. हीन जगणे जगण्यापेक्षा सेवा, भक्ती, त्याग, प्रेम या गुणांनी युक्त होऊन अंगी देवत्व आले की, भगवंताला पाहिजे असलेले चैतन्य आपल्याला प्राप्त होऊ शकते.
भगवंत भक्तीसाठी गुरुसेवा फार महत्त्वाची मानलेली आहे. ज्ञानावाचून मन म्हणजे वेसण नसलेला बैल होय. संसारातील प्रेम हे क्षणभंगुर असते. परंतु भगवंतावरील प्रेम हे अविनाशी असते. भगवंत नामाचे धन कोणी हिरावून घेऊच शकत नाही. त्यासाठी भगवंताप्रति निस्सीम भक्ती, श्रध्दा, प्रेम, भाव पाहिजे. मनातली चंचलता रोखण्यासाठी आत्मज्ञानाची जीवनात फार आवश्यकता असते. मन आणि आत्मा यांचे मिलन फक्त सत्संग, भजन पूजन याद्वारे होऊ शकते. आत्मज्ञानाने माणूस कठीण परिस्थितीतून सहजपणे मुक्त होऊ शकतो. त्यासाठी भगवंतभक्ती व सेवा महत्त्वाची आहे.ती अंतःकरणपूर्वक श्रध्देने केली पाहिजे. ज्या घरात भगवंताच्या नामाचा घोष चालू आहे, ते घर मंदिर आहे. भगवंताचा तेथे वास असतो. देव पावावा म्हणून प्रत्येकजण त्याची भक्ती करीत असतो. तसे पाहिले तर भक्ती म्हणजे भगवंताची आवड असते. मनुष्याला मात्र विषयांची आवड. मनुष्य देहांत विषय पाहतो तर संत विषयांत देव पाहतात. एवढाच माणसात आणि संतात फरक असतो. तात्पर्य सुखी जीवन जगायचे असल्यास भगवंताची निःस्वार्थ भक्ती करा.
(संकलन: किशोर स. नाईक, डोंगरी गोवा)