‘मोक्षसाधनमागेर्षु भक्तिरेव गरीयसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 08:06 PM2019-09-18T20:06:53+5:302019-09-18T20:06:58+5:30
ज्ञानादेव हि कैवल्यम....
भक्ती या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दामध्ये भज असा मूळ संस्कृत धातू आहे. त्याचा खरा अर्थ वाटून घेणे; आजच्या मराठीत बोलायचे झाले तर शेअर करणे असा आहे. एखादी व्यक्ती भक्ती करते म्हणजे ती आपली सर्व सुखदु:खे आपल्या आराध्याला सांगते, त्याच्याशी शेअर करते, असा अर्थ करता येतो. दैवी कृपा प्राप्त होण्यासाठी मात्र भक्ताची ही भक्ती निष्काम असणे मात्र जरुरीचे आहे.
सकाम भक्ती केल्यास जो काम म्हणजे इच्छा मनात असते, ती कदाचित पूर्ण होईलही; परंतु त्यापलीकडे मग काहीही साधणार नाही. त्याउलट निष्काम म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता भक्ती केल्यास त्याने सवार्थाने अधिक लाभ होऊ शकतो. कारण अशा भक्ती विशिष्ट उपचारांच्या गुंत्यामध्ये शरीराने न अडकता भक्त मनाने देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो.
दैवी कृपा संपादन करण्याच्या ज्ञानमार्ग, योगमार्ग इत्यादी इतर साºया मार्गाप्रमाणेच एक मार्ग या दृष्टीने समाज भक्तीकडे पाहतो. खरेतर या सर्वाचे अंतिम उद्दिष्ट एकच असते. मात्र नागरिक आपापल्या आवडीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे त्यातील एखादा मार्ग निवडतात. केवळ सुलभ आहे म्हणून भक्ती करावी असे नाही, तर इतर सर्व मार्गामध्ये ती श्रेष्ठ असल्याने तिचे आचरण करावे. ज्ञानादेव हि कैवल्यम असे म्हणणारे आद्य शंकराचार्यही हे ही प्रसंगी, मोक्षसाधनमागेर्षु भक्तिरेव गरीयसी, असे म्हणून तिचे मोठेपण मान्य करतात.