Dhanteras 2019 : जाणून घ्या काय आहे धनत्रयोदशीचं महत्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 09:56 AM2019-10-25T09:56:13+5:302019-10-25T09:57:35+5:30
धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.
धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याची प्रथा आहे.
धनत्रयोदशी या सणाबाबत एक पौराणिक कथा प्रचलित आहे. पौराणिक कथांनुसार, राजा हिमाच्या पुत्रावर मृत्युचा धोका होता. अशी भविष्यवाणी झाली होती की, लग्नाच्या चौथ्या दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यु होईल. लग्नाच्या चौथ्या दिवशी जेव्हा यमराज सापाच्या रूपात राजाच्या पुत्राला घेण्यासाठी गेला, तेव्हा नवविवाहित पत्नीने साहस दाखवत खोलीमध्ये चारही बाजूने दिवे लागले. आणि तिची आभूषणे व भांडी खोलीच्या प्रवेश द्वारावर ठेवली होती. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चमक पाहून सापाचे डोळे भ्रमित झाले आणि तो राजाचा पुत्राला सोबत न घेताच तेथून निघून गेला.
पौराणिक कथेतील याच मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा चालत आली आहे. असे म्हणतात की, भांड्यांची खरेदी करून परिवारातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यावरील संकट दूर होतं. तसेच घरात आनंद नांदतो.
शुभ मुहूर्त
यावर्षी तिथीची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी होते. जी पुढच्या दिवशी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी संपते. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी संध्याकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
खरेदीचा मुहूर्त
२५ ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपासून खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे. हा मुहूर्त २६ ऑक्टोबर दुपारपर्यंत राहणार आहेत. ज्यांना केवळ धनत्रयोदशी दिवशीच खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी दुपारी साडेचार ते रात्रीपर्यंत चांगला मुहूर्त आहे.