Dhantrayodashi 2019 : धनत्रयोदशीला का खरेदी केले जातात सोन्या-चांदीचे दागिने? काय आहे मान्यता...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 04:32 PM2019-10-22T16:32:47+5:302019-10-22T16:39:13+5:30
Dhanteras 2019 Importance : दिवाळीचा सण सलग पाच दिवस साजरा केला जातो. यातील पाचही दिवसांचं वेगवेगळं महत्व असतं. कार्तिक महिन्याच्या अमावसेला येणाऱ्या दिवाळी उत्सवाची तिथि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला सुरू होते.
दिवाळीचा सण सलग पाच दिवस साजरा केला जातो. यातील पाचही दिवसांचं वेगवेगळं महत्व असतं. कार्तिक महिन्याच्या अमावसेला येणाऱ्या दिवाळी उत्सवाची तिथि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला सुरू होते. यालाच धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. दिवाळी सणाला याच दिवसापासून सुरूवात होते. धनत्रयोदशीला खरेदी करण्याची आणि संपत्तीचा देव कुबेराची पूजा करण्याची प्रथा आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का की, धनत्रयोदशीला लोक भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी का करतात? खरंतर पुराणांमध्ये यामागे एक कथा सांगितली जाते.
(Image Credit : Social Media)
अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी किंवा तांब्याची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. असं केलं तर वर्षभर तुमच्या घरात धन-संपत्ती नांदते अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी खरेदी केल्याने घरातील प्रत्येक सदस्यांवरील आपत्ती टळून ते सुखी राहतात.
(Image Credit : Social Media)
पौराणिक कथांनुसार, राजा हिमाच्या पुत्रावर मृत्युची भिती होती. अशी भविष्यवाणी झाली होती की, लग्नाच्या चौथ्या दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यु होईल. लग्नाच्या चौथ्या दिवशी जेव्हा यमराज सापाच्या रूपात राजाच्या पुत्राला घेण्यासाठी गेला, तेव्हा नवविवाहित पत्नीने साहस दाखवत खोलीमध्ये चारही बाजूने दिवे लागले. आणि तिची आभूषणे व भांडी खोलीच्या प्रवेश द्वारावर ठेवली होती. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चमक पाहून सापाचे डोळे भ्रमित झाले आणि तो राजाचा पुत्राला सोबत न घेताच तेथून निघून गेला.
पौराणिक कथेतील याच मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा चालत आली आहे. असे म्हणतात की, भांड्यांची खरेदी करून परिवारातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यावरील संकट दूर होतं. तसेच घरात आनंद नांदतो.