संस्कारामुळेच होतो सुप्त मनाशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:03 PM2018-11-29T18:03:14+5:302018-11-29T18:09:54+5:30
व्यक्ती संस्कारक्षम असल्यावरच तो सकारात्मक गोष्टींचा विचार करतो.
संस्कार ही व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराचे अत्यंत महत्व आहे. या संस्कारामुळेच देश- देशातील लोक भारतात येथील संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येतात. अनेक परदेशी नागरिक तर येथील संस्कार आणि संस्कृतीच्या प्रभावाने येथेच स्थायिक होत आहेत. आपल्या संस्कारांमुळेच भारतीयांची जगात एक वेगळी ओळख आहे.
व्यक्ती संस्कारक्षम असल्यावरच तो मन, भावना, प्रेम, दया, करुणा, आदर, सत्कार यांसारख्या सकारात्मक गोष्टींचा विचार करतो. अशा प्रकारच्या भावना व्यक्तीच्या मनात उत्पन्न होणे, ही सुप्त मनाच्या जवळ जाण्याची वाट नव्हे का ? आणि सुप्त मनाच्या आनंदात चिरकाल मनसोक्त विहार करणे, म्हणजेच आत्म बोध होणे व अध्यात्म नव्हे का ? संस्कारांमुळेच व्यक्ती अध्यात्माच्या जवळ पोहचते. संस्कारच व्यक्तीला अध्यात्माची ओळख करून देतात.
अध्यात्माचा आणि संस्काराचा खूप जवळचा संबंध आहे. चांगल्या संस्कारा शिवाय व्यक्ती स्वतःच्या सुप्त मनापर्यंत पोहचू शकत नाही. आपल्या संस्कृती व्यक्ती किती ही मोठा उच्च पदस्थ असला तरी त्याचे संस्कार प्रथम पाहिले जातात. कुसंस्कारामुळे कंसासारखा महाबली राजा आपल्या स्वतःच्या मृत्यूचे कारण ठरला तर दुर्योधनासारखा महाप्रतापी योद्धा महाभारताचे कारण ठरला. यामुळे संस्कार इतके महत्त्वाचे आहेत, याद्वारे व्यक्तीला सुप्त मनापर्यंत पोहचता येते व आत्म सुखाचा शोध घेता येतो.
आजकाल उन्हाळी किंवा दीपावली सुट्ट्यांमध्ये संस्कार वर्गांचे प्रस्थ वाढले आहे. संस्कार वर्गास आपल्या पाल्यांना अनेकजण फीस देऊन पाठवत आहेत. संस्कार वर्गास फीस ही भरपूर आकारल्याची दिसून येते. अशा वर्गास आपल्या मुलांना पाठवणे, हे एक उच्चभ्रू लक्षण पालक वर्ग समजू लागला आहे. कौतुकाने इतरांना या बद्दल सांगतांना या लोकांना साधा एक प्रश्न ही पडत नाही की, खरंच या आठ – पंधरा दिवसांमध्ये संस्कार वर्ग करून आपली ही मुले संस्कारक्षम होतील का ? खरंच याची त्यांना गरज आहे का ? अशा संस्कार वर्गांमधून पाल्यांना काही शिकायला मिळेल असे पालक वर्गास वाटते. परंतू या अशा वर्गांना जाण्याची मानसिकता त्या बालकांची आहे का ? याची कुठलीच शहानिशा पालकांनी केलेली नसते. या मध्ये बालकांच्या मनाचा कुठलाच विचार न करता त्यांना या वर्गास पाठवले जाते. दोन-चार तास हे संस्कार वर्ग करून खरंच मुलांमध्ये संस्कार निर्माण होतात का ? यातून ते स्वतःच्या सुप्त मनापर्यंत पोहचतील का ? आत्म सुखाचा आनंद त्यांना घेता येईल का ? आजच्या युगात खरंच या असल्या संस्कार वर्गांची आवश्यकता आहे का ? आणि असेल तर फक्त बालकांसाठीच संस्कार वर्ग असावे की, मोठ्यांसाठी सुद्धा असावे ? प्रत्येक कुटुंबात असणारी लहान मुले जो पर्यंत बोलू शकत नाही. काही कृती करू शकत नाही. म्हणजे वयाच्या ३-४ वर्षांपर्यंत संस्कारक्षम असतात. जस-जशी ती मोठी होऊ लागतात. ती स्वतंत्र विचार करू लागतात. आपले विचार ते व्यक्त करू लागतात. त्यांच्या बोलण्यातून अचानक जर एखादा वाईट शब्द निघाला. तसेच त्यांच्या कृतीतून काही वाईट जाणवू लागले. तर पालकांना लगेच प्रस्थ माजलेल्या संस्कार वर्गांची आठवण येते. संस्कार शिकविण्यासाठी पालकांची पाऊले या वर्गांकडे वळू लागतात.
मुलांच्या बोलण्या-चालण्यातून शिव्या, खोटेपणा, राग, द्वेष, मत्सर यांसारख्या भावना आपल्या मुलांमध्ये आल्या कुठून ? असा प्रश्न पालकांना पडतो. खरे तर आपण सर्व पालक या मुलांच्या बाबतीत कमी पडतो. जे संस्कार आपण आपल्या वागण्या- बोलण्यातून मुलांना द्यायला हवे. ते संस्कार आपण दोन- चार तासांच्या वर्गांमधून मुलांमध्ये यावे, अशी भंपक अपेक्षा पैसे खर्च करून मुलांकडून करत असतो. वास्तविक घरातील मोठ्यांच्या वागण्याचे ही मुले अनुकरण करत असतात. मोठ्यांच्या छोट्यातल्या- छोट्या गोष्टींचे नकळतपणे ही निरागस बालके सूक्ष्मपणे निरीक्षण करत असतात. घरात असणाऱ्या मोठ्यांच्या बोलण्याचे अनुकरण व त्यांच्या शब्दांचा संग्रह ही मुले करत असतात. मोठ्यांच्या बोलण्याचा खूप मोठा आणि दुरगामी परिणाम मुलांच्या बोलण्यावर होत असतो. म्हणजेच संस्कारावर होत असतो.
अचानकपणे एखादा स्फोट व्हावा. त्याप्रमाणे ही बालके एखादी शिवी देवून किंवा वाईट बोलून आपल्यातले संस्कार जगा समोर उघड करतात. मग पालकांना प्रश्न पडतो. कुठे शिकला असेल अशी भाषा ? परंतू आपल्याच कुटुंबातील एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या तोंडचे शब्द नकळतपणे आपल्या मुलांनी उच्चारलेले असतात. जे नको तेव्हा कुलदीपकाने किंवा कुलदीपीकेने आपल्यातील संस्काराची भविष्यकाळातील मंद ज्योत पेटवून आपल्याला प्रकाश दाखवलेला असतो. मुलांच्या बोलण्यात येणारे अनेक शब्द व वाक्य हे घरातल्यांच्या वागण्या बोलण्याच्या अनुकरणाचे हे परिणाम असतात. हे सर्वजण विसरून जातात.
घरातील मोठ्यांचे संस्कार, बोलणे-चालणे योग्य असेल तर मुलांवर चांगलेच संस्कार होतात. आजची पिढी फार हुशार आहे. परंतू संस्काराच्या बाबतीत जरा कमीच आहेत. अनेक मुले सांगितलेले काम करत नाही. ही प्रत्येक पालकाची तक्रार आहे. घरात पाहुणे आल्यावर त्यांच्याशी बोलणे, आदर-सत्कार, नमस्कार यांसारख्या गोष्टी कमीच जाणवतात. याचे मुख्य कारण म्हणजे घरातील मोठी माणसे जो पर्यंत पाहुण्यांचा आदर-सत्कार योग्य करणार नाहीत. तोपर्यंत ही मुले शिकणार नाहीत. आजकाल खरे तर मोठ्या माणसांचे वागणे-बोलणे खूप चुकत आहे. घरा-घरात पती-पत्नीचे, सासू-सुनांचे, भावा-भावचे, बहिण-भावाचे, शेजाऱ्यांचे वाद ऐकायला मिळतात. हे कमी असेल तर टि-व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधील वाद हमखास ऐकायला मिळतात. या सर्वांनमधून आपली मुले संस्कारक्षम व्हावी अशी अपेक्षा करत असतो. अशा गोष्टींमुळे संस्कारक्षम बालके त्यांच्या सुप्त मनापसून आपण मोठी माणसे त्यांना दूर घेऊन जात असतो.
मोठ्यांच्या बोलण्या-चालण्याचा, समाजातील वाईट घटनांचा, चोवीस तास चालणाऱ्या मालिकांचा, मोबईल, फेस बुक, What’s app यांसारख्या गोष्टींमुळे या बालकांवर काय परिणाम होत आहे. याचा विचार करायला कुणालाच वेळ नाही. अपेक्षा फक्त माझे लेकरू संस्कारक्षम व्हावे. परंतू त्यासाठी मोठ्यांना संस्कारक्षम व्हावे लागेल. स्वतःचा मुलगा आई-वडिलांना शिव्या देत असेल, तुम्ही माझ्यासाठी काय केले? असले प्रश्न विचारत असेल,पती-पत्नी एकमेकांच्या माय-बापांवर शिव्या-शाप देत असतील, भाऊ भावाचा वैरी होत असेल, मित्र मित्राच्या आई-वडिलांवर ( मजाक शब्द वापरून ) शिव्या देत एन्जोय करत असेल, तर खरंच ही बालके संस्कारक्षम बनतील का ? यांना सुप्त मन कळेल का ? आत्मसुखाचा अनुभव यांना घेता येईल का ? आठ-पंधरा दिवसांच्या संस्कार वर्गातून संस्कारक्षम पिढी निर्माण होईल का ?
भारताच्या संस्कृती मध्ये असले संस्कार वर्ग होते. असे कुठेच वाचनात नाही. पिढ्यान-पिढ्या चालत आलेले चांगले संस्कार घरातील जेष्ठ मंडळी स्वतः आचरणात आणत होती. म्हणून संस्कारक्षम पिढी आपोआप निर्माण होत होती. त्यासाठी कुठलेही संस्कार वर्ग नव्हते. मुलांना दोन-चार तास बसवून असे कुठलेच संस्कार शिकवले जात नव्हते. मुलांना शाळेत दाखल करून संस्काराची जबाबदारी शिक्षकांवर व शाळेवर सोपवत आहे. शाळेत दाखल झालेले मुल संस्कारक्षम सुंदर वेष्ठनासह परत मिळावे. अशी अपेक्षा आपण करत आहोत. दुसऱ्या बाजूला आपण ज्या समाजाचे घटक आहोत. तो किती कुसंस्कारी झालाय. त्यात आपला ही फार मोठा सहभाग आहे. हे प्रत्येक जण विसरून संस्कारक्षम पिढीची अपेक्षा करत आहे. मोठी मंडळीच कुसंस्कारी झाल्याने. त्याची सावली लहानांवर पडून. संस्कारी भारतीय संस्कृती आपण सर्व कुसंस्कारी करत आहोत. जो पर्यंत मोठी माणसे संस्कारी होणार नाही. तो पर्यंत आजची पिढी संस्कारक्षम होणार नाही.
समाजात वावरतांना आपल्या बोलण्या-चालण्याचा परिणाम फक्त आपल्याच मुलांवर होत नाही. तर समाजातील प्रत्येक बालकांवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे मोठी माणसे संस्कारी होणे गरजेचे आहे. खरेतर अध्यात्म म्हणजे काय ? हे समजून घेण्यासाठी पहिले चांगले सुसंस्कारी व्हावे लागेल. आजच्या पिढीची नुसती चिंता विविध वर्ग लावून कमी होणार नाही. त्यासाठी मोठ्यांसाठीच संस्कार वर्ग असावे का? असा प्रश्न पडतो. सुसंस्कारातून जेव्हा प्रत्येकाचा सुप्त मनाशी संवाद होईल. तेव्हाच प्रत्येक जण आत्मसुखाचा अनुभव घेईल. सुसंस्कारातून व्यक्तीला आत्मिक आनंद मिळू शकतो. हे जर प्रत्येकास समजले, तर निश्चितच प्रत्येक व्यक्ती सुप्त मनाच्या जवळ पोहचेल व आपल्या संस्कारांनी भावी पिढीला ही या आत्म सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल. तसेच या संपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृतीच्या अध्यात्माच्या अमृत सागरात लीन करेल. म्हणूनच संस्कार आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे लक्षात घेतले पाहिजे.
- सचिन व्ही. काळे ( जालना )