ढेकणाच्या संगे हिरा जों भंगला; कुसंगे नाडला साधू जैसा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 12:34 AM2019-12-02T00:34:14+5:302019-12-02T00:34:24+5:30
खळांना कितीही कुरवाळण्याचा प्रयत्न केला तरी साधूने विचंवास कुरवाळल्यासारखे आहे.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
माणसाच्या भोवतीने असलेल्या गोतावळ्यात सुविचार आणि सुसंस्कारांची जोड असणारा एक जरी मित्र असेल तर जीवन स्वर्ग बनते आणि प्रचंड आघात होत असतानासुद्धा मित्र नावाचा सारथी तोल सावरण्यासाठी धावून येतो. ‘वाटेवरील काटे वेचत आणि खड्डे भरतच तुला पुढे जायचे आहे,’ या कटू सत्याची जाणीव करून देतो तोच खरा मित्र. जो आपल्या रसदृष्टीने कुरूपतेमध्येही सुरूपता निर्माण करून जीवनाची वेल हिरवीगार करण्याचा प्रयत्न करतो असा सज्जन सखा केवळ अभावानेच भेटतो, अन्यथा चोहीकडे भेटतात ती सायंकाळची जोडणी लावणारी, कुणाचा तरी कार्यक्रम करणारी आणि समाजजीवन ‘अस्वस्थ’ करणारी ‘दुर्जन’ मंडळी. ही जर आपल्या भोवतीने सापासारखी वळवळत असतील तर लोक आपलीही गणना या दुर्जनांतच करतात. म्हणून या दुर्जनांत मी असलो तरी त्यांच्यासारखा जगत नाही, असे म्हणण्यात काहीच पुरुषार्थ नाही. मी दुर्जनांच्या संगतीत राहतो, पण मी तसा नाही असा किती जरी डंका पिटला तरी लोक आपल्याला खळ दुर्जनांचा साथीदार म्हणूनच ओळखणार. त्यापेक्षा खळांची संगतीच नको. या संगतीच्या दुष्परिणामाचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात -
काय ढोरांपुढे घालुनी मिष्टान्न,
खरासी विलेपन चंदनाचे।
नको-नको देवा खळांची संगती,
रस ज्या पंगती नाही कथे ।
काय सेज बाज माकडा विलास,
आळंकारा नाश करूनि टाकी।
तुका म्हणे काय पाजूनी नवनीत,
सर्पाविष थीत अमृताचे॥
खळांना कितीही कुरवाळण्याचा प्रयत्न केला तरी साधूने विचंवास कुरवाळल्यासारखे आहे. कोणे एके काळी वाल्या कोळ्याचा वाल्मीकी ऋषी झाला असेल, पण आज शेकडो वाल्या कोळी नारदाचीच शिकार करण्यासाठी टपून बसले आहेत. अशा परिस्थितीत खळांना खड्यासारखे बाजूला करावे यासाठी एकापेक्षा एक सरस दृष्टांत देताना तुकोबा म्हणतात, ढोरांपुढे अथवा रेड्यापुढे पंचपक्वान्नाचे ताट मांडून काहीच उपयोग नाही. रेडा आपल्या मस्तीने त्याला उधळून लावून गावाबाहेरची नरकाडी करायला जाणारच. गाढवाच्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावला तरी हुक्की आल्यानंतर ते उकिरडा घोळायला जाणारच. माकडाच्या गळ्यात माणिक बांधून सुंदर कॉटवर त्याला गुबगुबीत अंथरूणे दिली तरी ते झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायला जाणारच. अगदी तसेच या खळांचे आहे. यांना सात्त्विक, ऋजू, संस्कारी, सत्त्वगुणी भाषा कळत नाही तर त्यांना तमोगुणी भाषेच्या जोड्यातच उत्तर द्यावे लागते, पण असे उत्तर देण्यासाठी सज्जन माणसे पुढे जात नाहीत. कारण आज सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रांत वेगवेगळे मुखवटे धारण करून खळांचा राजरोस संचार होत आहे. सज्जनास दुर्बळ ठरवून खळांचे साम्राज्य जेव्हा निर्माण होते तेव्हा सज्जनांनो! नेभळटपणाने खळांचे अत्याचार सहन करीत ‘आता आपण उगी राहावे, जे-जे होईल ते-ते पाहावे’ ही भूमिका सोडून देऊन सज्जन शक्तीने संघटित होऊन खळांचा प्रतिकार केला तर खळांची कोल्हेकुई निश्चित थांबणार आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणाले होते -
ढेकणाच्या संगे हिरा जों भंगला
कुसंगे नाडला साधू जैसा ।
भावे तुका म्हणे सत्संग बरा
कुसंग हा फेरा चौऱ्यांशिचा ॥