सगुण-निर्गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 04:21 AM2019-01-28T04:21:58+5:302019-01-28T04:24:36+5:30
ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाविषयी त्याचे अस्तित्व मानणाऱ्यांच्या मध्ये शेकडो वर्षांपासून ‘निर्गुण’ व ‘सगुण’ हे दोन मतप्रवाह आढळतात.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाविषयी त्याचे अस्तित्व मानणाऱ्यांच्या मध्ये शेकडो वर्षांपासून ‘निर्गुण’ व ‘सगुण’ हे दोन मतप्रवाह आढळतात. या शब्दांतच गुणरहितता सामावलेली असल्यामुळे ज्याला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, छाया नाही, नाव नाही, गाव नाही, नाते नाही व आकार नाही तो ‘निर्गुण परमात्मा’ याउलट जो भक्तांच्या कामासाठी नावारूपाला आला, गाव व नाते लडिवाळपणे स्थापित करू लागला. ऐश, श्रीवैराग्य ज्ञान, औदार्य व ऐश्वर्य या गुणांनी संपन्न झाला तो ‘सगुण परमात्मा’ जगद्गुरू शंकराचार्यांच्यापासून ते थेट उत्तरेतील कबीर, दादू-दयाल इथंपर्यंतच्या अनेक महापुरुषांनी निर्गुणाचे, ज्ञानाचे वा अद्वैताचे प्रतिपादन केले. दुसºया बाजूला सूर, मीरा, तुलसी यांनी सगुणाच्या विशिष्ट अवतार संकल्पनेचे प्रतिपादन केले. या सर्वांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात उदय पावलेल्या संत चळवळीने ‘सगुण-निर्गुणा’च्या एकत्वाचे प्रतिपादन केले. या चळवळीचे म्होरके ज्ञानोबा माउली म्हणू लागले.
।। तुज सगुण म्हणों की निर्गुण रें
सगुण निर्गुण एकु गोविंद रे।।
श्री विठ्ठलाच्या सगुण स्वरूपाचे प्रतिपादन करण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाने त्याच्या निर्गुण रूपाचा स्वीकार करताना म्हटले होते.
।। सहस्र दलात आकाशाच्या परी,
राहोंनी शरीरी शोभा दावीं।।
संत नामदेव रायांच्या या अभंगात वारकºयांच्या श्री विठ्ठलाचे सर्व व्यापकत्व सर्व स्तरांत व चरा-चरांत भरलेल्या रूपातून व्यक्त होते.