Adhyatmik : वेगवेगळे बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 03:22 AM2019-11-30T03:22:01+5:302019-11-30T03:22:30+5:30
या कलियुगामध्ये फसवणूक, भ्रष्टाचार... या गोष्टी सर्रास चालतात. अनेकानेक बातम्या कानावर पडतात, तेव्हा मनात विचार येतो की माणसं अशी का वागतात?
या कलियुगामध्ये फसवणूक, भ्रष्टाचार... या गोष्टी सर्रास चालतात. अनेकानेक बातम्या कानावर पडतात, तेव्हा मनात विचार येतो की माणसं अशी का वागतात? एखाद्यावर खूप प्रेम करतात आणि दुसऱ्यांना जखमा देतात हा विरोधाभास एकाच व्यक्तीच्या कर्मांमध्ये का दिसून येतो? पण याचे कारण ही हेच आहे की, प्रत्येक व्यक्तीबरोबरचा व्यवहार, संबंध एकाच प्रकारचा कसा असू शकतो? नाती वेगळी, सगळ्याबरोबरचा अनुभव वेगळा, ऋणानुबंध ही वेगळेच.
प्रसिद्ध लेखक एडगर केसी यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की, १८व्या शतकामध्ये एका व्यक्तीच्या पाठीवर व्रण होते, खूप नानाविध उपाय केले गेले, परंतु ते व्रण काही गेले नाहीत आणि भयंकर त्रास ही त्यामुळे सहन करावा लागायचा. एके दिवशी ती व्यक्ती एडगर केसीकडे गेली. ज्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की, ते समोरच्या व्यक्तीच्या पूर्वजन्मांना बघू शकायचे. जेव्हा एडगर केसी सुप्तावस्थेमध्ये जाऊन त्याच्या पूर्वजन्मांना बघतात, तेव्हा त्यांना दिसून येते की, ही व्यक्ती तीन जन्मापूर्वी एका राजाकडे काम करीत असे. राजा खूप निर्दयी होता. त्याचा नियम होता, त्याला कोणालाही काही संदेश पाठवायचा असेल, तर तो राज्यातल्या एका व्यक्तीला पकडून त्याच्या पाठीवर गरम लोखंडाच्या सळीने तो संदेश लिहायचा आणि पाठवायचा.
ही व्यक्ती त्या जन्मामध्ये त्याला काहीच झाले नाही, पण तीन जन्मानंतर त्याच्या स्वत:च्या पाठीवर असे व्रण आले की, त्याला उठता, बसता, झोपतानाही त्याचा अतिशय त्रास व्हायचा. सारांश हा की, कळत-नकळत आपणच आपल्यासाठी असे बांध घातले आहेत, ज्यामुळे जीवनाचा खरा आनंद, सुख आपणास मिळत नाही. वर्तमानामध्ये प्रत्येक कर्मावर आपण लक्ष ठेवले, सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला, तर पूर्वजन्माची सारी देणी फेडून जीवनाचा प्रवाह सरळ आणि सुखद करू शकतो.