नामाच्या अनुसंधानातूनच होतो भगवंताचा दिव्य साक्षात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:11 PM2019-11-23T13:11:32+5:302019-11-23T13:13:20+5:30
आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
सर्वांभूती भगवद् भाव हेच श्रीमद् भागवताचे प्रधान भक्तिसूत्र आहे. शांतीसागर एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात,
सर्वांभूती भगवद् भावो
या नाव मुख्य भक्ती पहा हो
तो सांगाती झालिया स्वयमेवो
काम क्रोध मोहो न शकती बाधु
आता प्रश्न असा आहे की, हा सर्वात्म भाव कसा प्राप्त होतो..? तो प्राप्त होण्याचे साधन कोणते..? सज्जनहो..! हा सर्वात्म भाव सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी अविरत साधना करावी लागते. सामान्य प्रापंचिक माणसाला हा भाव प्राप्त होण्यासाठी पिपीलिका मार्गानेच जावे लागते. हा सर्वात्म भाव प्राप्त होण्यासाठी एकनाथ महाराजांनी सात प्रधान पायर्या सांगितल्या आहेत.
1)अनुताप
2)अनुग्रह
3)अनुकरण
4)अनुसंधान
5)अनुराग
6)अनन्य भाव
7)आत्मनिवेदन
याच त्या पायर्या आहेत. आता क्रमशः यांचे थोडक्यात विवरण करू...!
परमार्थ साधनेला अनुतापापासून प्रारंभ होतो. त्रिविध तापाने त्रस्त झाल्याने व विषय सुखाचा वीट आल्यानेच साधक भगवद् भक्तीकडे ओढला जातो मग त्याला संत साहित्याचे श्रवण घडते. या श्रवणामुळे साधकात विवेक जागृत होतो. विवेक जागृत झाल्यामुळे संसाराविषयी तिरस्कार व परमेश्वराविषयी परमप्रेम त्याच्यात निर्माण होते. या प्रक्रियेलाच अनुताप असे म्हणतात असा अनुताप निर्माण झाला म्हणजे साधक अनुग्रहाकरिता सद्गुरु कडे जातो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थाची वाटचाल करतो. सद्गुरु साधकाला उपदेश करतात,
तेचिं उपदेश लक्षण वाचेसि माझे नाम कीर्तन शरीरी माझे नित्य भजन मद्रूपी मन निमग्न सदा
सद्गुरुच्या कृपेने साधकात नामसंकीर्तनाविषयी प्रेम, श्रद्धा, निष्ठा वाढत जाते व परमेश्वराविषयी अनुराग वाढत जातो. सद्गुरु कृपेने भक्ती दृढ, निष्ठ बनली म्हणजे साधक चढत्या वाढत्या प्रेमाने परमार्थ प्राप्तीची साधना करू लागतो. तो सद्गुरुचे अनुकरण करू लागतो. सद्गुरु जसे सदैव आत्मचिंतनात निमग्न असतात तसे साधक देखील वागू लागतो अशा प्रकारे सद्गुरुचे अनुकरण साधकाच्या भक्ती वाढीस पोषकच ठरते. नामाच्या अनुसंधानात त्याला भगवंताचा दिव्य साक्षात्कार होतो. नाम घेता घेता नाम धारकाची प्रतिभा जागृत होते. आणि ह्रदयस्थ परमेश्वराचे त्याला दर्शन होते मग साधक अनन्य भावाने भगवंताचीच भक्ती करू लागतो. अनन्य भक्ती दृढ झाल्यावर भक्त हा आत्मनिवेदनात प्रवेश करतो, असा हा क्रम आहे. आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रंमांक - 8329878467 )