आनंद तरंग - भगवंतांचा विभूतियोग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 04:51 AM2019-08-03T04:51:47+5:302019-08-03T04:52:07+5:30
‘‘पार्था, तुला एक महत्त्वाचा विचार सांगतो की, माझ्या असंख्य विभूती आहेत.
वामनराव देशपांडे
या संपूर्ण विश्वात सर्वत्र भगवंतांचेच अस्तित्व आहे, विविध रूपांत तो प्रकट झाला आहे, सर्व त्याच्याच विभूती पसरलेल्या आहेत हे सांगताना भगवंत म्हणतात,
नान्तो स्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्नप।
एष तूद्देशत: प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ।। गीता।।
‘‘पार्था, तुला एक महत्त्वाचा विचार सांगतो की, माझ्या असंख्य विभूती आहेत. असे समज ना की, या पृृथ्वीवर जेवढे गवत आहे, समुद्रावर जेवढ्या लाटा आहेत आणि वरल्या नभांगणात जेवढ्या चांदण्या आणि तारे आहेत, तेवढ्या माझ्या विभूती आहेत. त्यांना अंतच नाही. या माझ्या विभूतींचा विस्तार तुला सांगितला ना तो केवळ मी अगदी संक्षेपाने सांगितला इतकेच. तुला सत्य सांगतो पार्था, जे जे ऐश्वर्यसंपन्न आहे, देखणे आहे, बलाने युक्त आहे त्या माझ्याच परमेश्वरी तेजातून निर्माण झालेल्या माझ्याच अंशाने उत्पन्न झालेल्या असतात. एवढेच फक्त तू प्रथम जाणून घे. भगवंतांच्या सांगण्याचा हेतू एवढाच होता की, साधकाला जिथे जिथे सौंदर्य, शुचित्व, प्रामाणिपणा, सत्यप्रियता, अहिंसक वृत्ती, निखळ प्रेम, वाणीतले आर्जव, शुद्ध सात्त्विक मन भगवंतनामाने गच्च भरलेले अंत:करण प्रतीत होईल ते ते रूप हे भगवंतांचेच स्वरूप आहे हे समजावे. ती भगवंतांची विभूती आहे असे निश्चित समजावे. म्हणजे मग भगवंतांचा विभूतियोग समजून घेणे सोपे जाईल. गीतेमधला दहावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत सर्वच साधक भक्तांना जणू दिव्यदृष्टी देत म्हणतात की, जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, त्या सर्वांमध्ये भगवंतांचे स्वरूप आहे. भगवंतच आपले सामर्थ्य जीवसृष्टीला अर्पण करीत असतो. याचे सळसळते भान प्रत्येक जीवाला मात्र येणे आवश्यक आहे. यासाठी देहबुद्धीने जगणे संपुष्टात येणे आवश्यक आहे. एकदा देहबुद्धीने जगणे पूर्णपणे भस्मीभूत झाले की प्रथम ‘मी’पणाने जगणे संपते त्या दिव्य क्षणी भगवंताच्या नामस्मरणात जगणे सुरू होते.