दिवाळी : प्रकाशाचा उत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:13 AM2018-11-05T04:13:48+5:302018-11-05T04:14:46+5:30

दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्यामुळे मनाचे आरोग्यही चांगले राहते.

Diwali: Festival of Light! | दिवाळी : प्रकाशाचा उत्सव!

दिवाळी : प्रकाशाचा उत्सव!

googlenewsNext

दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्यामुळे मनाचे आरोग्यही चांगले राहते. आकाशकंदील, रांगोळी, दिवाळी पहाट आणि दिवाळी अंक या गोष्टी दिवाळीच्या सणाचा आनंद वाढवित असतात. दीपावलीचा सण हा अंधाराून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, आळसाकडून उद्योगशीलतेकडे आणि अनीतीकडून नीतीकडे नेणारा ठरतो अशी प्रार्थना आहे. ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी याच दीपोत्सवाच्या पाच दिवसांची महती सांगितली आहे. याशिवाय, दिवाळीच्या दिवसांत फटाके वाजवू नका. तसेच, सण साजरे करीत असताना खर्च कमी करून बचत करावी आणि समाजातील गरीब-गरजू लोकांना मदत करावी, असाही संदेश दिला आहे.

दिवस पहिला : धनत्रयोदशी - धन्वंतरी पूजन
सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी- धन्वंतरी पूजन आहे. या दिवशी दीपदान व परोपकार करण्यास सांगण्यात आले. त्यासंबंधीची एक पौराणिक कथाही आहे. गरीब-गरजूंनाही दीपावलीचा उत्सव साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाचे हिशोब लिहिण्याच्या वह्या आणतात. महिला घरातील सोन्याचे दागिने स्वच्छ करून त्यांची व धनाची पूजा करतात. या दिवशी धन्वंतरी यांचा जन्म झाला. त्यांची जयंती साजरी केली जाते.

दुसरा दिवस : नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान
मंगळवार, ६ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आहे. या दिवशी थंडीमध्ये त्वचा तजेलदार आणि टवटवीत राहण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी अभ्यंगस्नान केले जाते. भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराला ठार मारले. त्याने मृत्यूसमयी कृष्णाकडे वर मागितला. आपल्या मृत्यूच्या दिवशी सर्वांनी अभ्यंगस्नान करावे आणि सर्वत्र दिवे लावून हा दिवस साजरा केला जावा.

तिसरा दिवस ; लक्ष्मी कुबेरपूजन, अलक्ष्मी निस्सारण
बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली आश्विन अमावस्या असल्यामुळे याच दिवशी प्रदोषकाली म्हणजे सायं. ६ वाजून २ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत लक्ष्मी कुबेरपूजन करावयाचे आहे. लक्ष्मीची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी , कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे आहेत. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचीही पूजा करून तिचे गावाबाहेर विसर्जन केले जाते. अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात शस्त्र म्हणून झाडू असतो. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे. कुबेर हा संपत्तीचा रक्षक म्हणून मानला जातो. म्हणून त्याचीही लक्ष्मीबरोबर पूजा करतात.

चौथा दिवस : बलिप्रतिपदा,
गोवर्धनपूजा, अन्नकूट

गुरुवार, ८ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आहे. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी श्री विष्णूने वामन बटूचे रूप घेतले आणि बलीकडे तीन पावले जमीन मागितली. एका पावलात पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारताच बलीने आपले डोके पुढे केले. वामनबटूरूपी विष्णूने तिसरे पाऊल बलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात पाठवले. बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. या दिवशी समतेचा संदेश देणारा ‘अन्नकूट’ हा कार्यक्रम बºयाच मंदिरात सुरु असतो. व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजलेल्या हिशोबाच्या नवीन वह्या या दिवसापासून वापरण्यास प्रारंभ करतात.

पाचवा दिवस :
यमद्वितीया, भाऊबीज

शुक्रवार, ९ नोव्हेंबर रोजी यमद्वितीया, भाऊबीज आहे. भाऊबीज हा सण बहीण-भावाचे नाते दृढ करणारा आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी भाऊबीजेसाठी गेला होता. त्यामुळे गेली वर्षानुवर्षे भाऊबीजेची प्रथा आजही सुरू आहे. आजच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते.

Web Title: Diwali: Festival of Light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.