स्तुतीपर वैराग्य न करावे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:33 AM2019-05-07T06:33:57+5:302019-05-07T06:34:07+5:30
वैराग्य शब्द ऐकताच डोळ्यापुढे नि:स्वार्थी व नि:स्पृह व्यक्तीचंं चित्र उभंं राहतं. त्याच्याबद्दल आदराची भावना वाढते. याच अलौकिक पुरुषांनी समाज ...
वैराग्य शब्द ऐकताच डोळ्यापुढे नि:स्वार्थी व नि:स्पृह व्यक्तीचंं चित्र उभंं राहतं. त्याच्याबद्दल आदराची भावना वाढते. याच अलौकिक पुरुषांनी समाज घडविला, शिकविला आणि लोकहृदयात सद्गुणांची पेरणी केली. सर्वच पंथांचे संत महापुरुष व विचारवंतांंनी समाजाच्या ज्ञान व सुखात भर टाकून परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे. अनासक्त वृत्तीने कर्म करणारा निर्लोभी असतो. कौतुकात अडकत नाही. निंदेत पडत नाही, कर्म सोडत नाही व ते त्याला चिकटत नाही. हेच वैराग्याचं खरं लक्षण आहे. लोकांनी स्तुती करावी हा हेतू असेल तर असं वैराग्य स्वामींनी नाकारलं आहे. स्वामी आपल्या सूत्रात म्हणतात, ‘स्तुतीपर वैराग्य न करावं’ आत्मस्तुती हा वैराग्याला कलंक आहे. संस्कृतात राग या शब्दाचा अर्थ आवड असा होतो, वि हा उपसर्ग लागला की विराग शब्द बनतो. तेव्हा आवडरहित असा त्याचा अर्थ होतो. विरागाचंच वैराग्य झालं. या साधकाचा मनोव्यापार भौतिक स्तरावर नसतोच. त्याला परमार्थ हवा अर्थ नको. त्याची पदार्थातही आसक्ती नसते. म्हणून त्याला स्तुतीची फार मोठी बाधा आहे. स्तुती मानी लोकांचं खाद्य आहे. ज्ञानी, धनी व राजे भाट ठेवतात. स्वप्रेमी स्वत:वर काव्य, पोवाडे, चरित्र लिहून घेतात. जर हीच स्तुती वैराग्याला आवडत असेल तर राजात व त्यात फरक काय? वैराग्य मिरवायचं नसतं. मिरवणं, फिरवणं हे पण विकाराचंच गोंडस एक रूप आहे. असं ढोंग स्वामींनी लाथाळलं आहे. स्तुती ही जगात सगळ्यांंनाच आवडणारी गोष्ट आहे. एका धर्माला दुसरा धर्म, या पंथाला तो पंथ, या जातीला ती जात आवडत नाही, पण स्तुतीचं मात्र कुणालाच वावडंं नाही, स्तुतिपाठक चतुर असतो. भाट तर अंगी नसलेले गुणही चिकटवतात.