यश शिखराकडे नेणाऱ्या पाऊल वाटेस विसरू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 05:00 PM2019-03-22T17:00:52+5:302019-03-22T17:01:08+5:30

यशाच्या धुंदीतील वागणुकीमुळे आपली म्हणणारी माणसे हळू हळू त्याच्या पासून दूर जाऊ लागतात.

Do not forget the path which leads towards success | यश शिखराकडे नेणाऱ्या पाऊल वाटेस विसरू नये

यश शिखराकडे नेणाऱ्या पाऊल वाटेस विसरू नये

googlenewsNext

आज प्रत्येक व्यक्तीचे जीवन फार धका-धकीचे आणि व्यस्त झाले आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यस्त असल्याचा दिसतो. काहीच काम नसेल तर तो किमान मोबाईलमध्ये तरी व्यस्त असतो. तसेच काळानुरूप व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न आणि महत्वकांक्षा देखील बदलत आहेत. त्यासाठी व्यक्ती धाव-धाव धावत आहे. या धावपळीत व्यक्ती स्वतःच्या कुटुंबापासून, मित्रांपासून तसेच तो स्वतः पासून देखील दूर जात आहे. तसेच आपली सर्व स्वप्नपूर्ण करण्यासाठी व्यक्ती योग्य-अयोग्य अशा कुठल्या ही मार्गाचा अवलंब करत आहे. हे करत असतांना त्यामुळे त्याच्यावर होणाऱ्या परिणामांची त्याला काहीही चिंता नसते. त्याला फक्त आपली महत्वकांक्षा काहीही करून पूर्ण करायची असते. त्यासाठी तो वाटेल ती धडपड करत असतो.

हे सर्व करत असतांना तो सर्व देहभान विसरून गेलेला असतो. या सर्व गोष्टींचा त्याच्या अस्तित्वावर खूप मोठा परिणाम झालेला असतो. आपण आपली महत्वकांक्षा पूर्ण करत असतांना आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्याच माणसांची मने दुखावत आहे. हे तो विसरून जातो. आपले स्वप्नं पूर्ण व्हावे म्हणून आपल्या सोबत आपले कुटूंब, जिवलग मित्र, सहकारी इतर अनेकजण आपल्याला मदत करत असतात. हे व्यक्तीच्या लक्षात येत नाही. हे सर्व करत असतांना तो अनेक वेळा अनेकांची मने दुखावतो. अनेकांना अपेक्षा नसतांना मानसिक त्रास देतो. त्याच्या या अशा वागण्याचा त्याच्याच आप्तेष्टांना खोलवर जखमा देत असतो. असे वागणे असले तरी त्याच्यासाठी जगणारी माणसे त्याच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती सुद्धा धडपडत असतात. त्याच्या प्रयत्नाने आणि त्याच्यासाठी झटणाऱ्या माणसांमुळे एकदिवस त्याची सर्व स्वप्नं पूर्ण होतात. त्याला जणूकाही आकाश ठेंगणे झाल्या सारखे वाटू लागते. आपल्या सारखे कुणीच नाही, या भ्रमात तो जगू लागतो. आपल्यापेक्षा बाकीचे सर्व तुच्छ आहेत असे त्याला वाटू लागते. आपण जे करतो, बोलतो तेच बरोबर असते. बाकीच्यांना काहीच कळत नाही असे त्याला वाटू लागते. त्याच्या या अशा वागणुकीमुळे त्याची आपली म्हणणारी माणसे हळू हळू त्याच्या पासून दूर जाऊ लागलेली असतात. 

स्वतःच्या धुंदीत असल्याने व्यक्तीला हे लक्षात ही येत नाही की, आपण हळू हळू एकटे पडू लागलेलो आहोत. एकदिवस अचानक त्याच्या आयुष्यात एखादे वादळ असे येते की, त्याचे होते नव्हते ते सर्व हरवून बसते. अशा वेळी त्याला आधार हवा असतो तो त्याच्या मायेच्या माणसांचा परंतू त्या क्षणाला तो एकटा असतो. पुन्हा आधारासाठी तो त्यांच्याकडे पाहतो. परंतू आधीच दुखावली गेलेली मने ताक ही फुंकून पिऊ लागतात. त्यावेळी त्याला मागील सर्व गोष्टी आठवू लागतात. आपल्या यशात या सर्वांचा वाटा होता. वेळो वेळी आपण या सर्वांकडून काहीनाकाही शिकत होतो. त्यांच्या असण्यामुळेच, त्यांच्या आधारामुळेच, त्यांच्या मदतीमुळे तसेच वेळोवेळी दिलेल्या योग्य सल्ल्यांमुळे आपण इथवर पोहचलो आहोत . हे त्याला आता जाणवू लागते. पण आता उशीर झालेला असतो. कारण तो ज्यांना आपली माणसे म्हणत असतो. ती आता दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी झिजू लागलेली असतात. तसेच त्याच्या मनापासून दूर गेलेली असतात.

याकरता प्रत्येक स्वप्नं पूर्ण करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपले स्वप्नंपूर्ण करण्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी आपल्या माणसांनी कधी कधी कळत नकळतपणे आपल्याला मदत केलेली असते. कधी तरी त्याच्या दृष्टीने चूक असले तरी मोलाचे मार्गदर्शन केलेले असते. आपल्या प्रगतीवर आपल्याला जरी वाटतं असेल की, ही सर्व जण जळतायत. तर ती जळत नसून ती त्याच्या यशाने खुश झालेली असतात. फक्त ती आपल्याला हवे असलेल्या पद्धतीने व्यक्त करू शकत नसतात. हे प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या लक्षात यायला हवे. म्हणून यशाच्या शिखरावर पोहचल्यावर शिखरापर्यंत पोहचण्याचा मार्ग कायम लक्षात असावा. तसेच या मार्गावरील अनेक फाटक्या-तुटक्या पालांमध्ये राहत असलेल्या आप्तेष्टांनी कधी काळी आपल्याला आधार दिलेला होता. तेव्हाच आपण इथवर पोहचू शकलो. म्हणजे पुन्हा संकटाच्या काळात आधार मिळतो व यशाच्या शिखरावर स्थान अबाधित राहते.

- सचिन व्ही. काळे ( 9881849666 ) 

Web Title: Do not forget the path which leads towards success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.