व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी तप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:50 PM2019-08-09T14:50:53+5:302019-08-09T14:51:22+5:30
चातुर्मास
सोलापूर : ‘प्रत्येक माणसाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी जीवन कृतार्थ होण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार तप करायलाच हवे़ पवित्र अशा या श्रावण महिन्यात जप, तप, पूजा-अर्चा, धर्म, आराधना, सत्संग, प्रवचन, भजन, कीर्तन, उपवास करून सत्प्रवृत्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. संत भगवंताप्रती दृढ विश्वास व निष्ठा हवी. आपण आजारी असताना ज्या डॉक्टरांकडे जातो त्या डॉक्टरांच्या प्रती आपल्या मनात श्रद्धा व विश्वास असेल तर रोग लवकर बरा होतो. त्याप्रमाणेच धर्म आराधनेचे आहे. साधकाचे शरीर, मन, बुद्धी निर्मळ व पवित्र होण्यासाठी तपाचरणाचा फार छान उपयोग होतो.
चातुर्मासाच्या या काळात सत्संगात राहून गुरु संत यांचे विचार ग्रहण करायला हवेत. मोठी मंडळी, गुरू, संतजन यांच्यासमोर वागताना संकोच हवा, विवेक हवा, सात्विकता आणि विनम्रता हवी. ईश्वराप्रती अढळ विश्वास हवा. संतांची वाणी श्रवण करताना श्रद्धेने, भक्तीने व निष्ठेने करा. ते जसे सांगतात तसे आचरण करण्याचा प्रयत्न करा.
शरीराला, मनाला, बुद्धीला आकार देण्याचे काम तपाचरणामुळे शक्य होते. तप हे इंद्रियांना अंकित ठेवण्यासाठी आहे. शरीर ताब्यात आलं की, मनालाही आवर घालता येतो. त्यामुळे आपोआपच मग मोह, माया, क्रोध, मत्सर हे विकार गळून पडतात. जीवदयेचे प्रबल प्रेरक गुरुदेव श्री रुपमुनीजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस चालणाºया विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती गौतम मुनींनी दिली.
- गौतम मुनीजी,
जैन मुनी, सोलापूर