दुर्बुद्धि ते मना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:56 AM2019-06-17T03:56:45+5:302019-06-17T03:59:25+5:30

जर मन ‘रोगट’ राहिले, तर सद्बुद्धी अन् स्वत:च्या कार्यसिद्धीसाठी वापरण्यात येणारी बुद्धी दुर्बद्धीत परिवर्तित होते.

dont think bad about anyone | दुर्बुद्धि ते मना

दुर्बुद्धि ते मना

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले

कुठलेही चांगले काम कुणीही केले तर त्या कामाची मनापासून प्रशंसा करणे ही झाली माणसाची सद्बुद्धी, जी एखाद्या मिणमिणत्या पणतीसारखी सभोवतालचा अंधार नष्ट करण्याचे काम करते. उत्तम कामगिरी करणाऱ्याला त्यामुळे उत्तेजन आणि प्रेरणा मिळते. हे चक्र अबाधितपणे सुरू राहिले की चांगले काम करणाऱ्यांची समाजातील संख्या वाढत जाते. त्यात सातत्याने वृद्धी होत जाते. ते समाजाच्या हिताचे असते. म्हणून सद्बुद्धीचे प्रणेते संत ज्ञानोबा माउलीने म्हटले होते की,
जैसी दीप कळीका धाकुटी । परी बहु तेजाते प्रकटी ।
तैसी सद्बुद्धी ही धाकुटी म्हणो नये ॥

सद्बुद्धीला कधी ‘धाकटी’ म्हणू नये, कारण सद्बुद्धीच सद्विचाराचे संवर्धन करून समाजात सद्भावनेच्या बागाङ्खफुलविण्याचे काम करते; पण दुसºयाच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी अन् सद्गुणाची पूजा बांधण्यासाठी मनाची निरोगी मशागत व्हावी लागते. या निरोगी मशागतीमुळे दुसºयाच्या चांगल्या कामाची स्तुती करण्याची स्थिती प्राप्त होते. जर मन ‘रोगट’ राहिले, तर सद्बुद्धी अन् स्वत:च्या कार्यसिद्धीसाठी वापरण्यात येणारी बुद्धी दुर्बद्धीत परिवर्तित होते. दुर्बद्धी जर डोक्यात घुसली तर समाजात ‘दुर्याेधना’चा जागोजाग सुळसुळाट व्हायला वेळ लागत नाही. दुर्योधनी प्रवृत्तीची दुर्जन माणसे दुर्याेधनाप्रमाणेच म्हणत राहतात, जनामि धर्मम न च में प्रवृत्ति। जनाम्य धर्मम् नच में निवृत्ति: मी धर्र्म जाणतो; पण त्याच्याकडे प्रवृत्त होता येत नाही, दुर्याेधनाची हीच प्रवृत्ती आज गल्ली-बोळातील आधुनिक दुर्योधन प्राणपणाने जतन करीत आहेत. सारे काही उत्तम चालले की त्यांना राहावत नाही. सरळ, शांत, संयमी, अहिंंसक समाजमन पाहिले की असे दुर्याेधन अस्वस्थ होतात आणि समाजाला हिंसेच्या ज्वालांनी होरपळून टाकावे यासाठी महापुरुषांच्या जयंती-मयंतीपासून ते जातीय, धार्मिक, राजकीय संघर्षामध्ये सद्बुद्धीचा बिनदिक्कत बळी दिला जातोय. समाजात अशी शेकडो माणसे आपल्याला भेटतात की ‘जे काहीतरी भानगड आहे’ याच अर्धसत्याच्या शोधार्थ दिवाभीताप्रमाणे रात्रीचा दिवस करतात आणि घरचे खाऊन गावाला शिक्षा देतात. मुळात ज्यांची वृत्तीच छिद्रान्वेशी आहे, जे नेहमी कुत्सीत बुद्धीने दुसºयाच्या वैगुण्यावर कावळ्यासारखी चोच मारण्यासाठी टपून बसलेली असतात. असे समाजकंटक अनेक ठिकाणी बिनदिक्कत वावरताना दिसतात. विनाकारण समोरच्यावर कडाडून टीका करणे हे त्यांचे जीवितकार्य असते. तसे झाले तरच त्यांना समाधान मिळते. ज्यांचे वर्णन करताना तुकोबांनी म्हटले होते, दुष्टबुद्धीच्या दुर्जनांची बुद्धी कधी अंतरंगातून भिजत नाही. त्याला जन्मभर उपदेश केला तरी पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखे होते. जन्माला आल्यानंतर जे स्वत: तमोगुणाच्या पाठीमागे वळतात, त्यांच्या हाती सद्बुद्धीचा दिवा देऊन काय उपयोग? गदर्भाला महातीर्थात स्नान घातले तरी त्याचा काहीच उपयोग नाही. वेळ आली की ते उकिरड्यावर लोळायला जाणारच. कितीही केले तरी पालथ्या घडावर पाणीच टाकल्यासारखे होते. घडा कधीच भरला जात नाही. श्रम मात्र वाया जातात. तेव्हा दुर्बुद्धीवर आयुष्यभर तोंडसुख घेत बसण्यापेक्षा ती निर्माणच होणार नाही यासाठी प्रत्येक कुटुंबनावाच्या सद्भावनेच्या विद्यापीठात जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावा. म्हणूनच तर तुकोबाराय म्हणाले होते -
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजों नारायणा
आता मज ऐसे करी । तुझें पाय चित्ति धरी ।
उपजला भावों । तुझे कृपे सिद्धी जावो
तुका म्हणे आता । लाभ नाही या परता ।

Web Title: dont think bad about anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.