श्रमणसंघीय वाचनाचार्य : डॉ. विशालमुनीजी म. सा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:54 PM2019-11-12T16:54:25+5:302019-11-12T16:55:16+5:30
डॉ. विशालमुनीजींचा जन्म नेपाळमध्ये कार्किनेटो गावात १२ नोव्हेंबर १९५३ मध्ये झाला.
- डॉ. पारस सुराणा
जैन समाजातील अग्रणी संतांमध्ये विद्वतेचे शिखर पुरुष, जैन धर्माची गरिमा वाढविणारी दैदीप्यमान विलक्षण विभूती, श्रेष्ठ आचरण, सेवा व समर्पण वृत्ती, प्रगाढ गुरुभक्ती, शांत प्रशांत स्वभावासह, ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’च्या भावनेने प्रेरित झालेले, ‘सर्वे सुखिन: सन्तु’ द्वारे जनतेला कल्याणमार्ग दाखविणारे डॉ. विशालमुनीजी मानव समाजाचे आधारस्तंभ बनलेले आहेत. आज (दि. १२) त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त...
डॉ. विशालमुनीजींचा जन्म नेपाळमध्ये कार्किनेटो गावात १२ नोव्हेंबर १९५३ मध्ये झाला. त्यांचे वडील ब्राह्मण परंपरेतील उपाध्याय वंशीय पंडित वासुदेव, तर आई नंदकला देवी दोघेही अत्यंत धर्म परायणी व सदाचारी. बालक खगरामचे जीवन आई -वडिलांनी केलेले संस्कार व दिलेले शिक्षण यामुळे सद्गुणांनी परिपूर्ण झाले. शालेय जीवनातच वडिलांकडून त्यांनी वेद, उपनिषद, पुराण, गीता, रामायण आदी ग्रंथांचा व वैदिक संस्कृतिचा अभ्यास केला. वडील वैदिक कर्मकाण्डी ब्राह्मण असून, सुद्धा त्यांनी त्या काळात वैदिक पशू हिंसेस प्रखर विरोध केला. यथार्थ तेची जाणीव व क्रांतिकारक विचार खगरामने वडिलांकडून आत्मसात केले. प्राथमिक शिक्षणानंतर हायस्कूल शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलमध्ये पाठविण्यासाठी मुलाचे संस्कार बिघडतील या भयामुळे वडिलांनी नकार दिला, परंतु आई नंदादेवीने मुलाची पुढील शिक्षण घेण्याची तळमळ ओळखून कुटुंबात चर्चा घडवून पुढील शिक्षणासाठी भारतात काशी येथे गुरुकुलात पाठविण्याचे सर्व संमतीने ठरविले. इतर साथीदार काशी-वाराणसीला जात होते. त्यांच्याबरोबर वडिलांच्या अनुपस्थितच आईने खगरामला पाठवून दिले. मठाधीश ब्रह्मानंद स्वामींनी खगरामचे नाव ब्रह्मचारी बनल्यानंतर गंगाराम ठेवले परंतु मठातील महंतगीरी बडेजाव, अर्थलोलुपता बघून गंगारामचे मन विचलित झाले.
वडील गृहस्थाश्रमी असून, सुद्धा त्यांचे आचरण सन्यासी मठाधीशापेक्षा खूप श्रेष्ठ असल्याची जाणीव झाली. त्यांनी मातृभूमीला परत जाण्याचा निर्णय घेऊन दिल्लीला प्रयाण केले. दिल्लीहून नेपाळकडे प्रयाण करताना रेल्वेत बसताना चुकून दुसऱ्याच गाडीत बसले. तिकीट बघून टीसीने त्यांना मेरठ जंक्शनला उतरवून दिले. मेरठ लष्करी छावणीत त्यांचा गाववाला रंगनाथ शर्मा (रंग बहादूर) राहतो याची आठवण झाली. तेथे मिल्ट्रीमध्ये भरतीप्रक्रिया चालू होती. भेट झाल्यावर त्यांनी सांगितले की, सन्यासी बनन्यापेक्षा सैनिक बनून केलेली देशसेवा कधीही श्रेष्ठ आहे. मेरठ छावणीमध्ये त्यांची भरतीप्रक्रियेत निवड झाली. परंतु आठवी उत्तीर्णचे सर्टिफिकेट नसल्यामुळे ते दिल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले. गंगारामने आठवी उत्तीर्णचे सर्टिफिकेट पाठविण्यासाठी वडिलांना पत्र पाठविले. त्यात बराच कालावधी लागणार असल्यामुळे लाला खैराती शहा जैन यांच्या कारखान्यात तात्पुरते कामास लागले. तेथे जैन साधू-संतांचा परिचय, धार्मिक वातावरण यामुळे पुन्हा वैराग्याकडे आकर्षित झाले. त्यातच भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यामुळे मेरठ छावणीतील जवानांना सीमेवर पाठविण्यात आले. युद्धामध्ये वीर सेनानी रंगबहादूर शहीद झाले. जीवनातील नश्वरतेमुळे त्यांच्या मनात वैराग्य भावना प्रबळ झाली. आपणास बाहेरील शत्रूंपासून एवढे भय नाही जेवढे मनातील षडरिपंूपासून आहे याची जाणीव झाली. २२ जानेवारी १९७२ मध्ये कांधला येथे त्यांची जैन भागवती दीक्षा संपन्न होऊन ते सुमतीप्रकाश जींचे शिष्य विशालमुनी बनले. दीक्षा पश्चात त्यांनी प्रवर्तक श्री. शांतीस्वरूपजी म.सा. व बहुश्रृत श्री. फुलचंदजी म.सा. यांच्याकडे जैन आगम व जैनदर्शन यांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर व्यावहारिक शालेय व कॉलेज शिक्षण गुरुंच्या प्रोत्साहनामुळे चालूच ठेवले. त्यांच्या जीवनात वैदिक संस्कृती व श्रमण संस्कृतीचा सुरेख समन्वय झाला.
मेरठ विश्वविद्यालयातून त्यांनी एम. ए. केले. बनारस विद्यापीठातून ते शास्त्री परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हैसूर विश्वविद्यालयात रामचरित मानस व जैन रामायण यांच्यावर तुलनात्मक शोध-ग्रंथ सादर करून पी.एच.डी. पदवी प्राप्त केली. पऊम चरित्र व रामचरितमानस यांच्या तुलात्मक शोध निबंधास भागलपूर विश्वविद्यालयाने डी.लीट पदवीने सन्मानित केले. अशाप्रकारे सरस्वतीची आराधना चालू असताना संपूर्ण भारतभर २२ राज्यात जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा केली. त्यांच्या प्रभावी प्रवचन शैलीने तत्त्वज्ञानातील गहन सिद्धांत साध्या सोप्या भाषेत बाहेर पडतात. त्यामुळे जैनेत्तर व्यक्तीसुद्धा तत्त्वज्ञानातील गहन सिद्धांत साध्या सोप्या भाषेत बाहेर पडतात. त्यामुळे जैनेत्तर व्यक्तीसुद्धा आपल्या प्रवचनास श्रद्धापूर्वक उपस्थित राहतात. आपल्या तप, त्याग आणि साधनामय संयम जीवनात प.पू. आचार्य आनंदऋषीजींद्वारे वयाच्या ३३व्या वर्षी १९८६ मध्ये उपाध्यायपद, तर २००३मध्ये आचार्य उमेशमुनीजींद्वारे युवाचार्यपद अशी उत्तरोत्तर भरभराट झाली. श्रमण संघाच्या एकतेसाठी २००९ मध्ये युवाचार्य पदाचा त्याग करून, मी युवाचार्य बनण्यासाठी नाही तर महेंद्रऋषीजींना युवाचार्य बनविण्यासाठी जात आहे ही घोषणा करून आपली नि:स्पृहता विदित केली. त्यानंतर २०१२ मध्ये डॉ. शिवमुनीजीं आचार्यांद्वारे त्यांची वाचनाचार्य या गरिमामय पदावर नियुक्ती झाली. डॉ. विशालमुनीजींचा चातुर्मास गुरुदेव, सुमती प्रकाशजींबरोबर वाशी-मुंबई येथे सुरू आहे. जिनेंद्र प्रभूकडे त्यांच्या दीर्घायू स्वस्थशील यशस्वी जीवनासाठी मंगल कामना.
(अध्यक्ष, केवडीबन श्री संघ)