Dussehra 2019 : जाणून घ्या काय आहे विजयादशमीचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 09:44 AM2019-10-08T09:44:38+5:302019-10-08T09:47:20+5:30
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. यावर्षी दसरा ८ तारखेला साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती.
पौराणिक कथांनुसार, भगवान रामाने दहा तोंडाच्या रावणाचा याच दिवशी वध केला होता. म्हणून हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी रावणाचं दहनही केलं जातं. जेणेकरून आपल्यातील क्रोध, भ्रम, ईर्षा, स्वार्थ, अन्याय आणि अहंकाराचा नाश करू शकू.
काय आहे दसऱ्याचा अर्थ?
दसऱ्याचा अर्थ होतो दशमी म्हणजे दहावी तिथी. ज्योतिषांनुसार, वर्षभरात ३ सर्वात मोठ्या शुभ तिथी असतात. पहिली चैत्र शुक्ल प्रतिपदा, दुसरी कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि तिसरी दसरा. असे मानले जाते की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केल्यास लाभ होतो. त्यामुळे या दिवशी अनेकजण नव्या कामांना सुरुवात करतात.
शुभ मुहूर्त
विजयादशमी तिथी - ७ ऑक्टोबरला १२.३९ पासून दशमी सुरू होईल ते ८ ऑक्टोबर दिवशी दुपारी १४:५० पर्यंत असेल.
या दिवसाबाबत मान्यता
१) दसऱ्याच्या दिवशी भगवान निलकंठांचे दर्शन करणे शुभ मानले जाते.
२) या दिवशी वाहन, इलेक्ट्रिनिक्स वस्तू, सोनं, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ मानलं जातं.
३) दसऱ्याच्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करणं शुभ मानलं जातं.
४) असे मानले जाते की, या दिवशी कोणत्याही कामाला सुरुवात केल्यास त्यात यश मिळतं.
५) रावण दहनानंतर थोडी राख घरात ठेवणेही शुभ मानले जाते.