नामस्मरण : सर्वात सोपा भक्तीमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:14 PM2020-04-11T18:14:24+5:302020-04-11T18:15:00+5:30
नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला, तर सर्व प्रकार हे परस्वाधीन आहेत.
नामस्मरणाचा मार्ग. हा भक्तीमार्ग सर्व मार्गातील सर्वात वेगळा, सोपा आणि शीघ्र फलदायी असा आहे. भक्तींमध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे विविध प्रकार आहेत; परंतु यातील नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला, तर सर्व प्रकार हे परस्वाधीन आहेत. दुस-यावर अवलंबून असे आहेत.
इतर भक्तीमार्ग वस्तू, व्यक्ती, काळ, वेळ यावर या सर्व अवलंबून आहेत; मात्र, नामस्मरणाला कसलेही बंधन नाही. त्यामुळेच हा बंधमुक्त असा भक्तीप्रकार आहे.
भक्ती मार्गातील श्रवण भक्तीमध्ये श्रवण करण्यासाठी कोणती तरी कथन करणारी शक्ती पाहिजे, वक्ता पाहिजे, कथाकार पाहिजे, कीर्तनकार पाहिजे. नुसती श्रवण करण्याची इच्छा असून चालत नाही, तर त्याची सिद्धता, तयारी पाहिजे. इथे परावलंबित्व आले. दुस-यावर आधारित ही भक्ती झाली, पण नामस्मरणाचे तसे नाही. फक्त इच्छा व्यक्त केली की, लगेच नामस्मरण सुरू करता येते. त्यासाठी दुसरे कोणी असण्याची गरज नाही. त्यामुळे हा अत्यंत सोपा आणि चांगला मार्ग आहे. तसेच कीर्तन भक्ती करायची म्हटली, तर त्यासाठी विशिष्ट प्रकारचा पोषाख आला, आसन आले. कुठेही जाऊन कीर्तन करता येत नाही. त्यासाठी विशिष्ट अशी जागा असली पाहिजे. ही सगळी सिद्धता असली तरच कीर्तन करता येते. याउलट नामस्मरणाचे तसे नाही. कसलीही तयारी नको. कसलीही सिद्धता नको. कसलाही पोषाख नको. कोणी समोर असण्याची गरज नाही. कसल्या साथीची गरज नाही. इच्छा झाली की, नामस्मरण भक्तीला सुरुवात करता येते. त्यामुळे अतिशय साधी सोपी आणि सहज साध्य असा हा भक्तीमार्ग आहे.
नामस्मरण भक्तीसाठी कसल्याही वेळेचे, काळाचे, स्थानाचे बंधन नाही. ज्याप्रमाणे आपल्याबरोबर आपला श्वासोच्छवास असतो, त्याप्रमाणे नामस्मरण करता येते. प्रत्येक क्षणी आपण नामस्मरण करू शकतो. अगदी जेवतानाही आपण नामस्मरण करू शकतो. अखंडित चिंतीत जावे, अशी ही नामस्मरण भक्ती असते. अन्य कोणत्याही भक्तीप्रकारापेक्षा नामस्मरण भक्ती ही त्यामुळेच सर्वांना आवडते.
- वेदांताचार्य राधे राधे महाराज
बर्डेश्वर संस्थान, तरवाडी, ता. नांदुरा