सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:30 PM2017-08-03T20:30:55+5:302017-08-03T20:31:12+5:30
समजा एखादे लहान मूल हिंदुच्या घरात जन्माला आले व ते पळवले गेले आणि ख्रिश्चन माणसाच्या घरात जाऊन पडले तर ते भविष्यात स्वत:ला ख्रिश्चन म्हणवणार. पण जर ते हिंदूच्या घरीच वाढले असते तर ते स्वत:ला हिंदू म्हणवणार. म्हणजे या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत.
- सदगुरू श्री वामनराव पै
कल्पनेने धुमशान घातलेले आहे
समजा एखादे लहान मूल हिंदुच्या घरात जन्माला आले व ते पळवले गेले आणि ख्रिश्चन माणसाच्या घरात जाऊन पडले तर ते भविष्यात स्वत:ला ख्रिश्चन म्हणवणार.पण जर ते हिंदूच्या घरीच वाढले असते तर ते स्वत:ला हिंदू म्हणवणार.म्हणजे या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत.लहान मुलाला लहानपणी जात,धर्म, वर्ण हे काहीच नसते पण आपण समाज त्याला ते सर्व चिकटवितो व हे लहानपणीच चिकटविल्यामुळे ते त्याच्या अंतर्मनात जाते.लहानपणी मुलांचे बहिर्मन हे अगदीच शून्य असते व अंतर्मन कार्यरत असते. त्यामुळे आपण लहानपणी जे काही मुलांना शिकवितो ते ती चटकन शिकतात.लहान मुले नवीन भाषा चटकन शिकतात पण मोठयांना एखादी नवीन भाषा शिकायला वेळ लागतो.आमच्या बंधूची केरळला बदली झाली होती तेव्हा तिथे आमची पुतणी तिकडची भाषा चटकन शिकली.कारण ती तेव्हा लहान होती.आमचा नातू लहानपणी कॅनडाहून भारतात आला तेव्हा त्याची भाषा जवळजवळ इंग्लिशच होती व त्यानंतर ते ते गोव्याला स्थायिक झाले तेव्हा तो कोंकणी भाषा देखील चटकन शिकला. आता मी हे का सांगतो आहे कारण मला तुम्हाला हे सांगायचे आहे की लहान मुले तुम्ही जे शिकवाल ते चटकन शिकतात.त्याचे कारण लहान मुलाचे बहिर्मन हे अगदीच शून्य असते व अंतर्मन मात्र कार्यरत असते.त्यामुळे तुम्ही त्याला जे काही लहाणपणी सांगता व शिकवता ते त्याच्या सोबत आयुष्यभर कायम स्वरूपी असते.कारण ते तेव्हा त्याच्या अंतर्मनात गेलेले असते.आपण महाराष्ट्र गुजरात किंवा महाराष्ट्र कर्नाटक असा सीमाप्रश्न असे म्हणतो आणि महाराष्ट्रातून गुजरात मध्ये प्रवेश केला असे म्हणतो पण जमिनीला विचारलेत तर ती म्हणेल कसला गुजरात.जमिनीला हे नाव वगैरे काहीच ठाऊक नसते.तिला ही नावे माणसाने दिलेली आहेत.हे ही काल्पनिक आहे हे लक्षांत घेतले तर या कल्पनेचा इतका प्रभाव आहे की या कल्पनेनेच सर्व गोंधळ घातलेला आहे.कोकणी भाषेत सांगायचे तर अक्षरश: धुमशान घातलेले आहे.कल्पनेने धुमशान घातलेले आहे.त्यामुळेच जगात हाणामारी दंगेधोपे हे सगळे चाललेले असते.मानवजात हया काल्पनिक गोष्टींमुळे विभागली गेलेली आहे.जात, धर्म, वर्ण, कुळ, गोत्र हया सर्व गोष्टी त्याला चिकटल्या गेलेल्या आहेत.जीवनविद्या काय सांगते लहान मुलाला मानवी संस्कृतीचे संस्कार द्या.आज त्याला निरनिरळ्या संस्कॄतीचे संस्कार दिले जाता.हिंदु संस्कृती, मुस्लीम संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, पारशी संस्कृती, बौध्द संस्कृती अशा निरनिराळ्या संस्कृतीचे संस्कार त्याला दिले गेल्यामुळे मानवजात आज विभागली गेलेली आहे.त्यातून पुढे माणूस विभागला जातो.हे विभाजन काल्पनिक असले तरी माणूस विभागला जातो हे मात्र खरे.वर्णामुळे प्रांतामुळे,राष्ट्रामुळे माणूस विभागला जातो.मानवजातीची ही जी विभागणी झालेली आहे ती सोयीसाठी केली गेली हे ठीक आहे किंबहूना ती सोयीसाठीच आहे पण आज ती गैरसोय झालेली आहे.