सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 4
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:21 PM2017-07-24T12:21:30+5:302017-07-25T16:32:00+5:30
आमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे.
- सदगुरू श्री वामनराव पै
दारिद्रयाइतका मोठा शाप दुसरा नाही
आमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे. लोकसंख्या जितकी वाढेल तितका भ्रष्टाचार देखील वाढत जाईल.मागणी व पुरवठा हा जो अर्थशास्त्राचा एक नियम आहे त्याप्रमाणे मागणी जास्त व पुरवठा जर कमी असेल तर तिथे भ्रष्टाचार सुरू होतो.आमच्या तरुणपणी तरुण मुलांना कॉलेजमध्ये या म्हणून बोलवत असत.आता 90 टक्के असतील तरी या नाहीतर येऊ नका असे म्हटले जात.लोकसंसख्या एवढी वाढलेली आहे की त्यामुळे भ्रष्टाचार देखील वाढतो आहे.भ्रष्टाचार होतो असे म्हणत असताना तो का होतो याच्या मुळाशी आपण जात नाही.त्यामुळे आज समाजात जे प्रॉब्लेम्स आहेत त्यापेक्षा अधिक प्रॉब्लेम्स भविष्यात वाढत जातील.मग कुणी कितीही आश्वासने दिली तरी त्याची पूर्तता करणे केवळ अशक्य होईल.जीवनविद्या सांगते दु:ख का निर्माण होते याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी दारिद्रय हे प्रमुख कारण आहे.दारिद्रयाइतका मोठा शाप दुसरा कोणताही नाही.हे दारिद्रय कमी करण्यासाठी मुख्य उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करणे हा होय.एकदा का इथे नियंत्रण आले की पुढील सर्व गोष्टी आपोआप नियंत्रणात येतील.लोकांना खायला अन्न मिळेल,लोकांना रहायला घरे मिळतील,आज लोकांना रहायला घर नाही हयाचे कारण काय? एखादी बिल्डिंग उभी केली व अर्ज मागवले तर त्यासाठी लाखोनी अर्ज येतात.थोडक्यात मागणी जास्त व घरे लिमिटेड आहेत.यासाठी लोकांनी शहाणपणाने वागले पाहिजे व सरकारने देखील आपले धोरण बदलले पाहिजे.हयाला काय वाटेल त्याला काय वाटेल असे म्हणत राहिले तर पुढच्या पिढया तुम्हांला कधीच क्षमा करणार नाहीत.एक काळ असा होता की विवाहित स्त्रीला “अष्टपुत्र सौभाग्यवती भव” असा आर्शिवाद दिला जायचा.अष्टपुत्र म्हणजे आठ मुलगे व आणखी मुली देखील म्हणजे एकूण डझनाच्या खाली काही बोलायचे नाही.तुम्ही म्हणाल त्यावेळी वामनराव असे कसे होत होते हो. किंवा त्यावेळी हा आर्शिवाद बरोबर होता का? सांगतो…त्यावेळी काय होते आपला शेतीप्रधान देश होता त्यामुळे अन्नाचा पुरवठा मुबलक होता व दुसरे म्हणजे युध्द वरचेवर व्हायची त्यामुळे युद्धामध्ये माणसे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडायची.घर चालविण्यासाठी शेती करावी लागे व शेतीसाठी घरात माणसे भरपूर असावित म्हणून अष्टपुत्र व्हावेत असा आर्शिवाद दिला जात असे.त्यावेळी घरातील स्त्रीया घर सांभाळायच्या व पुरुषांनी शेती सांभाळायची म्हणजे थोडक्यात ही एक प्रकारे केलेली समान श्रमविभागणी होती. त्यामुळे त्या काळी लोकसंख्या वाढली तरी चालत असे.लोकसंख्या वाढली तरी ती युध्द-लढाया यामुळे माणसांची संख्या कमी होत असे.असं म्हणतात की आपण दु:ख ओढवून घेतो व सुखाला दूर फेकतो.पण खरंतर सुखाला जवळ करायचे व दु:खाला फेकून द्यायचे असते.आता या दु:खाला जवळ करायचे व सुखाला फेकून दयायचे की सुखाला जवळ करायचे व दु:खाला दूर करायचे हे तू ठरवायचे आहेस कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार|