सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 5
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:25 PM2017-07-24T12:25:30+5:302017-07-25T16:32:21+5:30
माणसाला सुख हवे असते पण ते त्याला मिळत नाही त्याला दु:ख नको असते पण तरी देखील दु:ख त्याच्यापाठी हात धुऊन लागते.इथे मनात प्रश्न निर्माण होतो.
- सदगुरू श्री वामनराव पै
पर्यावरणात सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत.
माणसाला सुख हवे असते पण ते त्याला मिळत नाही त्याला दु:ख नको असते पण तरी देखील दु:ख त्याच्यापाठी हात धुऊन लागते.इथे मनात प्रश्न निर्माण होतो. लक्षात ठेवा जीवनविद्या नेहमी का हा प्रश्न विचारा असे सांगते. कारण प्रश्न विचारला की त्यातून तुमच्या चिंतनाला सुरवात होते.तुम्ही वाचन करू लागता श्रवण करू लागता त्यातून तुमचा अभ्यास व्हायला लागतो त्यात जर तुम्हांला ख-या सदगुरुंचे मार्गदर्शन मिळाले की तुम्हांला त्या प्रश्नांचे उत्तर मिळू लागते.म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की प्रश्न विचारा.सायंटिस्ट काय करतात? ते स्वत:ला प्रश्न विचारतात व त्यांच्या संशोधनाला सुरवात करतात.फळ खाली का पडले वर का गेले नाही हा प्रश्न पडला व त्यावर संशोधन झाले.असे का? या प्रश्नाने जीवनात क्रांती घडते म्हणून जीवनविद्येला का? हा प्रश्न फार आवडतो.प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारला की तुम्हाला ब-याच गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.अर्थात त्याला वाचन-श्रवणाची जोड ही हवीच नाहीतर तुम्ही उगीच का-का? करत बसलात तर कावळे व्हाल दुसरे काही होणार नाही.सांगायचा मुद्दा असा की माणूस जन्माला आल्यापासून दु:खी होतो त्याचे कारण काय?याचा जर आपण विचार केला तर माणसावर जन्मोजन्मी जे संस्कार होतात ते संस्कार जर विशिष्ट पध्दतीने झाले तर मानवी जीवनात सुखी होतो.आता इथे मी केवळ माणूस म्हणून विचार करतो.तो कुठल्या जातीचा,पंथाचा,धर्माचा असा विचार करत नाही.कारण संतांनी सर्व भूतमात्राचा विचार केलेला आहे आणि भूतमात्रांमध्ये आणि माणसाचा देखील संबंध येतो.आपण पर्यावरण असे म्हणतो.पर्यावरणामध्ये पशु-पक्षी जलचर माणसे हया सर्वांचा समावेश होतो.पर्यावरणात सर्व एकमेकांवर अवलंबून असतात.जशी एक वीट घसरली तर दुसरी वीट घसरते तिसरी वीट घसरते व शेवटी संपूर्ण इमारतच कोसळते.तसेच पर्यावरणाचे आहे.एक घटक घसरला की दुसरा घटक घसरतो व सगळे पर्यावरण बिघडू लागते.पृथ्वीचा किंवा पाण्याचा लय झाला तर बाकी सगळ्यांचा लय होणार,प्रकाशाचा लय झाला तर जगात काहीच उरणार नाही.हवेचा लय झाला तर कुणीच शिल्लक रहाणार नाही.आपले शरीर तरी काय आहे? आपल्या शरीरांत पंचकर्मेंद्रिये आहेत,पंच ज्ञानेंद्रिये आहेत,पंच तन्मात्रा आहेत.मन चित्त बुध्दी अहंकार हे सर्व मिळून आपण आहोत.त्यात कल्पना भावना धारणा हया सर्व शक्ती मिळून आपण आहोत.यातले काहीही एक वजा केले तरी जीवनाला अर्थ उरत नाही.तुमची स्मरणशक्ती वजा केली तर तुमच्या जीवनाला काही अर्थ उरणार नाही. तुमच्या ठिकाणची जाणीव वजा केली तर जीवनाला काही अर्थ उरणार नाही.तुमच्या शरीरातला प्राण काढून घेतला तर जीवनच शिल्लक रहाणार नाही.