सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 7
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:27 PM2017-07-25T12:27:15+5:302017-07-25T16:32:47+5:30
शास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे.अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार?
- सदगुरू श्री वामनराव पै
अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागते
शास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे. अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार? त्या मुंबईत रहाणा-या माणसाला काय स्थान असणार? व त्याने केलेल्या कुठल्यातरी नवसाची देवाला काय किंमत असणार? लोक उपवास करतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो अरे उपवास कशाला करता? तर ते म्हणतात, “उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईल” अरे देवाला काय पडले आहे तू उपवास कर नाहीतर चार वेळा जेव.नाहीतर निर्जळी उपवास करतात.लोकांचा एक समज झालेला आहे की आपण उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईळ, देवाचा रोष होईल आणि हे वारंवार बजावून सांगणारे लोक देखील समजामध्ये आहेत.बुवाबाबा, काही महाराज, देवऋषी हे या लोकांना या गोष्टी बजावून सांगतात.त्यामुळे लोक आज या भितीने ग्रस्त झालेले आहेत.आज लोकांसमोर इतक्या समस्या आहेत, इतके प्रश्न आहेत, इतकी संकटे आहेत की त्यातून बाहेर कसे पडायचे हे लोकांना समजत नाही व त्यांना अचूक मार्गादर्शन कुणीच करत नाही.आग लागलेली आहे रामेश्वरी व बंब चाललेले आहेत सोमेश्वरी असा प्रकार आज होतो आहे.रोग झालेला आहे रेडयाला व इंजेक्शन देतात पखालीला असे केले तर रेडा कसा बरा होणार? दु:ख माणसाच्या वाटयाला का येते याचा जर आपण विचार केला तर माणसावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांचा पगडा इतका माणसाच्या मनावर घट्ट झाला आहे की तो त्यामुळे भितीग्रस्त झालेला आहे.त्यात परिस्थिती देखील फार भयानक आहे.परिस्थिती भयानक होण्याची कारणे देखील मी सांगितली.याचे पहिले कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ, दुसरे कारण भ्रष्टाचार, तिसरे कारण रोगराई, चौथे कारण दारिद्रय व या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अचूक मार्गदर्शन करणारे लोक आज दुर्मिळ झालेले आहेत.खरंतर अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागते.अरे बाबा, तुझ्या दु:खाला कारण तूच आहेस अन्य कुणीही नाही.तुझ्या सुखाला कारण तूच आहेस अन्य कुणी नाही. हे तू लक्षांत घेशील, तू परिक्षण करशील, निरीक्षण करशील, विश्लेषण करशील| तर तुला माझ्यात काय दोष आहेत, ही परिस्थिती माझ्यावर का आली, कशामुळे माझ्या जीवनांत प्राब्लेम्स निर्माण होतात हे तुझ्या लक्षात येईल.“पहावे आपणासी आपण” हा परमार्थातला विषय मी आता सांगत नाही कारण तो फार गहन आहे.साध्या जीवनात देखील माणसे आपल्यात काय देाष आहेत,आपल्यात गुण काय आहेत याचा विचार करीत नाहीत.माणसे इतरांचा विचार करतात,इतरांचे गुण काय, दोष काय याचे चांगले विश्लेषण करतील पण आपल्या गुणदोषांकडे कधी पहातच नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात “कासयासी वानू आणिकांचे दोष मज उणे काय कमी असे”|