आनंद तरंग - मृत्तिकाभक्षण लीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 06:34 AM2019-11-07T06:34:21+5:302019-11-07T06:34:25+5:30
भागवतात कृष्णाच्या बाललीला वाचताना मनाला अतिशय आनंद होतो
शैलजा शेवडे
भागवतात कृष्णाच्या बाललीला वाचताना मनाला अतिशय आनंद होतो. कृष्णाच्या लीलांनी प्रत्येकाच्या मनात अक्षरश: वात्सल्याच्या लाटा उसळतात. मृत्तिकाभक्षणाचा प्रसंग... सर्व गोपबालक खेळत असताना यशोदेकडे आले आणि म्हणाले, कृष्णाने माती खाल्ली आहे. यशोदेने त्याला दटावून विचारले. तेव्हा, काय झाले, कवितेत वाचा.
नाही गं आई, खाल्ली मी माती.
सारे सारे खोटे बोलती. आई, बघ तू, मुख हे माझे,
आणि मग तू रागाव, माझ्यावरती।
तो परमेश्वर विश्वपालक,
लीलेसाठी झाला बालक,
आ करतो तो खट्याळ होऊन,
दाखवितो मुख विस्मयकारक।
इवल्याशा त्या मुखी दिसे तिज,
पर्वत, सागर, ज्योतिर्मंडळ,
पाही यशोदा, थक्क होऊन,
त्यात स्वत:सह सारे गोकूळ।
काय असे हे अद्भुत अद्भुत,
स्वप्न, बुद्धिभ्रम सर्व मायावत,
हे मम बालक दैवी विलक्षण,
अचिंत्य ईशपदा, नमन, नमन।
व्रजेश्वराची पत्नी असे मी,
पुत्र हा माझा, माझे गोधन,
विपरीत बुद्धी, देई अशी जो,
त्या परमेशा, माझे नमन।
साक्षात्कार हा राही क्षणभर,
परत जणु ती ये भानावर,
पुत्रस्नेहमयी वैष्णवी माया,
तो जगदीश्वर पसरवी तिजवर।
वात्सल्याने भरे हृदय ते, मांडीवरती त्याला घेई,
तिन्ही वेदही, ज्याला गाती, परमेशाची होई आई।