अहंकारमुक्त मन हे सदविचारांचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 05:18 PM2018-12-29T17:18:13+5:302018-12-29T17:18:30+5:30

याची देही याची डोळा या म्हणण्यानुसार प्रत्येकास आपल्या कर्माचे फळ हे भोगावे लागतील.

Ego-free mind is root of positive thoughts | अहंकारमुक्त मन हे सदविचारांचे गमक

अहंकारमुक्त मन हे सदविचारांचे गमक

Next

मानवाच्या जन्म जणू काही दुःख भोगण्यासाठी झाला आहे असे आपल्याला भासते. आसक्ती हे मूळ दुःखाचे कारण असून राग मोह मत्सर हे त्यात वाढ करतात. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात,

रजतमसत्व आरे ज्याचे अंगी ।
याचे गुणे जगी वाया गेला ।।
तम् म्हणजे काय नरक केवळ ।
रज तो सनक मायाजाल ।।

 

मानवाच्या कर्मानुसार पाप-पुण्य संचित होते. याची देही याची डोळा या म्हणण्यानुसार प्रत्येकास आपल्या कर्माचे फळ हे भोगावे लागतील. मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म मानला जातो. ज्यांना हा जन्म लाभला त्यात स्वतःचा उद्धार करण्याची संधी ईश्वराने प्रदान केलेली असते. त्याचा यथोचित उपयोग  करण्याऐवजी माणूस हा सुखाच्या मागे लागलेला आहे.
बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे 
मानवाच्या उद्धारासाठी जेवढ्या संत विभूती होऊन गेल्या त्यात महाराष्ट्रात बहुसंख्य झाले. त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हटले जाते. भक्ती संप्रदायाचे वारे बाराव्या शतकापासून सर्वत्र पसरले आहे.महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे पाहिले जाते. अगदी बालवयात सर्व मनुष्यप्राणी मात्रास देव विद्या व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा  मंत्र त्यांनी दिला.
 

'मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले'. या  ज्ञानदेवांच्या आगळ्यावेगळ्या रचनेत त्यांनी मन हे राम रंगी रंगले आहे. असे सांगून वृत्ती प्रवृत्ती नष्ट होऊन निवृत्ती प्राप्त झाल्याचे ते सांगतात. नवविद्या भक्ती व समाधी स्थिती यांचा सुरेख संगम घडवून आणून भक्तिमार्ग आणि योगमार्ग या दोन्ही ईश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.

'अहंभाव लोपणे' हा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील अंतिम टप्पा असून  या अर्थपूर्ण रचनेत भक्ती आणि योगाचे मर्म सहजतेने स्वतःच्या अनुभवाने मांडलेले आहे. चिरंतन मूल्यांचा आणि आचारधर्माची  शिकवण संतांनी मानवांना दिली आहे.  ते म्हणतात आपल्याजवळील अहंकार नष्ट करावा. आणि सर्वांनी समभावाने वागावे. यामुळेच मनुष्य सदगतीस प्राप्त होतो. सर्वाविषयी क्षमा भाव ठेवावा. मनामध्ये एकत्वाचे चिंतन असावे. जेणेकरून अहंभाव लोप पावतो. हीच वाक्यता गर्भित स्वरूपात संत निवृत्तीनाथ मांडताना म्हणतात, समता  वर्तावी अहंता खंडावी, तेनीची पदवी मोक्षमार्ग, अहंकार मुक्त मन हेच सदविचार व सदगतीचे लक्षण असून सदविचारांच्या वाढीचे गमक आहे.

- भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

Web Title: Ego-free mind is root of positive thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.