आनंद तरंग - आनंद पुढे ढकलू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:40 AM2019-01-09T06:40:44+5:302019-01-09T06:41:17+5:30
प्रत्येक जीवमात्राला आनंद हवा असतो. पैसा असो, अधिकार असो की शरीरसुख असो, हे सगळे आनंदासाठीच केले जाते. काही लोक तर दुर्दशेतही खूश असतात.
श्री.श्री. रविशंकर
प्रत्येक जीवमात्राला आनंद हवा असतो. पैसा असो, अधिकार असो की शरीरसुख असो, हे सगळे आनंदासाठीच केले जाते. काही लोक तर दुर्दशेतही खूश असतात. कारण त्यात त्यांना आनंद मिळतो. आनंदी होण्यासाठी तुम्ही कारण शोधत असता आणि ते मिळाले, तरीही तुम्ही खूश नसता. शाळेत जाणाऱ्या मुलाला वाटते की, तो कॉलेजमध्ये जाऊ लागला की, जास्त स्वातंत्र मिळेल आणि तो जास्त आनंदी होईल. कॉलेजमध्ये जाणाºया मुलाला विचारले की, तो आनंदी आहे का, तर त्याला वाटते की, त्याला चांगली नोकरी मिळाली की तो आनंदी होईल. नोकरीधंद्यात नीट स्थिरस्थावर झालेल्या एखाद्याशी बोललात, तर तुमच्या लक्षात येईल की, आनंदी होण्यासाठी तो एखाद्या उत्तम जोडीदाराची वाट पाहात असतो आणि तसा उत्तम जोडीदार मिळाला की, मग आनंदी होण्यासाठी तो एक बाळ होण्याची वाट पाहात असतो. मुले असलेल्या एखाद्याला विचारा ते खूश आहेत का? तर ते म्हणतात, मुलांना चांगले शिक्षण देऊन ती नीट मोठी होऊन त्यांच्या पायावर उभी राहिल्याशिवाय त्यांना स्वस्थता कशी मिळणार? निवृत्त झालेल्या, सर्व जबाबदाºया पार पाडलेल्यांना विचारा की, ते आनंदात आहेत का? तर ते म्हणतात की, त्यांच्या तरुणपणीचे दिवस किती छान होते!
संपूर्ण आयुष्य भविष्यात कधीतरी आनंदी होण्याच्या तयारीतच निघून जाते. हे म्हणजे असे झाले की, संपूर्ण रात्र अंथरुण नीट घालण्यातच निघून गेली आणि झोपायला वेळच मिळाला नाही. तुमच्या आयुष्यातही किती मिनिटे, तास, दिवस तुम्ही खरोखर आतून आनंदी राहण्यात घालविली आहेत? बस, तेवढेच क्षण तुम्ही खरे आयुष्य जगलात. तो कदाचित तुम्ही अगदी लहान असतानाचा काळ असेल, जेव्हा तुम्ही एकदम खूश, आनंदी किंवा काही क्षणी खूप त्रासात असाल, पोहत असाल किंवा डोंगरावर चढत असाल, पण वर्तमान क्षणात जगून मजा करत असाल. जीवनाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे असा विचार करणे की ‘एखादे विशिष्ट ध्येय साध्य झाल्यावर मी आनंदी होईन.’ आणि दुसरा म्हणजे, ‘काहीही झाले, तरी मी आनंदीच आहे.’ तुम्हाला कोणत्या पद्धतीने जगायचे आहे? जीवन म्हणजे ८०% आनंद आणि २०% दु:ख आहे, पण तुम्ही त्या २० टक्क्यांना धरून ठेवता आणि त्याला २००% बनविता. हे मुद्दाम केले जात नाही, पण आपोआप घडते. आनंदाने, जागृतपणे, सावधपणे आणि ममतेने वर्तमान क्षणात राहून जगणे यातच ज्ञानप्राप्ती आहे. लहान बालकासारखे असणे यातच ज्ञानप्राप्ती आहे.