सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३१, प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 02:54 PM2017-09-19T14:54:31+5:302017-09-19T14:55:32+5:30
जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात.
- सदगुरू श्री वामनराव पै
जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात. कुणीच वाईट नसतं पण त्यांचं बोलणं वाईट असते. बोलताना जर तुम्ही चांगले बोललात तर भांडणे होणारच नाहीत. सासू सांगते सूनेचे दोष तर सून सांगते सासूचे दोष. सूनेच्या ठिकाणी गुणही आहेत व दोषही आहेत. पण त्यातील गुण पहायचे की दोष पहायचे हे सासूने ठरवायला हवे.
सूनेच्या ठिकाणी जे दोष आहेत तेच फक्त जर सासूने पाहिले व दुस-याला सांगत सुटली तर ते ऐकणारे नंतर तिच्याच सूनेला जाऊन सांगतात तुझी सासू असं असं बोलत होती. सुनेची देखील तिच गोष्ट.तिने जर सासूचे दोष पाहिले व दुस-यांना सांगितले तर सासू भेटल्यावर ही माणसे तिच्या सासूला सांगतात की तुझी सून असं असं म्हणत होती.मग त्यामुळे काय होतं. संत सांगतात त्याप्रमाणे मुळात माकड त्यात मद्य प्याला त्यात विंचू चावला त्यात डोके फिरले.तसे सासूसुनेचे नाते म्हणजे विळाभोपळा आता त्यात अशा त-हेने जर कुणी आगीत तेल ओतले की आग अधिकच भडकणार. कुटुंबात अशाच प्रकारे भांडणे होतात. घरांत भांडणे होवू लागली की घरातले स्वास्थ बिघडते.
कुटुंबातील प्रत्येक स्त्री फार महत्वाची असते. पुरूष श्रेष्ठ असे समाज जे म्हणतो ते खरे नाही कारण कुटूंबातील स्त्री श्रेष्ट असते. घरातील स्त्री जर शहाणी तर त्या घरात सुख नांदेल पण तिच जर मुर्ख असतील तर त्या घरात ब्रम्हदेव जरी आला तरी सुख नांदू शकणार नाही. जर स्त्री शहाणी असेल तर ती त्या घरात स्वर्ग निर्माण करेल पण जर ती मूर्ख असेल तर ती त्या घराचा नर्क करेल. याचे कारण तिचे बोलणे. घरातील सगळे चांगले असले तरी त्यांचे बोलणे फार महत्वाचे असते. एक सिनेमा आला होता. बावर्जी नावाचा सिनेमा होता. खरंतर तो मी काही पाहिला नाही पण मला त्याची कथा माहित आहे. त्या सिनेमातील माणसे एकमेकांशी भांडत असतात कारण प्रत्येकाला एकमेकांबद्दल गैरसमज असतात. पण हा बावर्जी काय करतो. तो प्रत्येकाला सांगतो की घरातील प्रत्येकजण तुझ्याबद्दल कसे चांगले बोलत. त्यामुळे त्या माणसांना वाटते अरे दुसरे आपल्याबद्दल चांगले बोलतात आणि आपण उगीच गैरसमज करून घेतो.
अशा प्रकारे तो बावर्जी चांगले बोलून त्या घरात स्वर्ग निर्माण करतो. त्या बावर्जीला जर ही अक्कल होती तर घरातल्या इतर लोकांना ती नव्हती का? पण असे करायला कुणी सांगत नाहीत किंवा कुणी शिकवित नाही. जेव्हा तुम्ही चांगले बोलाल चांगले चिंतन कराल चांगली इच्छा कराल आणि जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले कराल तर मनाला किती शांती मिळते ते अनुभवा.