हरिपाठ
By Admin | Published: September 10, 2016 12:33 PM2016-09-10T12:33:40+5:302016-09-10T12:46:33+5:30
वारकरी संप्रदाय हा भक्तीसंप्रदाय आहे. संप्रदायाचे अधिष्ठान श्रीविठ्ठल आहे. हे त्या निर्गुण निराकार आद्य परब्रह्माचे सगुण साकार रुप आहे.
डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा
वारकरी संप्रदाय हा भक्तीसंप्रदाय आहे. संप्रदायाचे अधिष्ठान श्रीविठ्ठल आहे. हे त्या निर्गुण निराकार आद्य परब्रह्माचे सगुण साकार रुप आहे. वारकऱ्याने भक्तिसाठी नित्यनेमाने पंढरीची वारी निष्काम भावाने करावी आणि हरिनाम उच्चारणाने आत्मरुपाने सर्वत्र भरलेल्या त्या विठ्ठलाचे अनुसंधान साधावे आणि त्याच्याशी संलग्न राहावे. यासाठीच नित्य हरिपाठाचा पाठ करावा असा संकेत आहे. या हरिपाठाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा ग्रंथ रचलेला आहे तो संसारी जीवासाठी तसेच मुमुक्षु साधकासही मार्गदर्शन करतो. हरिपाठ म्हणजे वाचेने नामाचे उच्चारण पुन:पुन: करणे अशा पाठामुळे मंत्राक्षराची अबध्दता नष्ट होते. जिभेला नामाची सवय व गोडी लागते आणि भगवंताचे नामरुप हृदयात ठसते तसे पाहता हरिपाठ वा वेदपाठच आहे. ‘‘हरि :ओम तत्सत्’’ या महामंत्राचे ‘‘हरि मुखे म्हणा हरि मुखं म्हणा’’ हे प्राकृत रुप होय. ज्ञानदेवांनी राम, कृष्ण, गोविंद, गोपाळ, विष्णू, नारायण ही कामे हरिनामाच्या बरोबरीने नामस्मरणासाठी सांगितली. भगवंताचे स्वरुप मानवी कक्षेच्या आवाक्याबाहेरचे आहे. फक्त भगवंताचे नामरुप व आत्मरुप सुलभ आहे. नाम उच्चाराबरोबर मानव सहजच ईश्वराशी जोडला जातो. संत म्हणतात ‘‘नाम उच्चारिता कंठी । पुढे उभा जगजेठी।।’’ खरेच अत्यंत एकाग्रस्तेने मनुष्य हरिनामाशी जोडला जातो, त्यावेळी तो विश्वाला विसरतो आणि त्याच्या सर्व उर्मी शांत होतात. हाच त्याच्या जीवनातील धन्य काळ ठरतो. सामान्य व्यवहारी दृष्टीने पाहिले तर जगता कुठल्याही वस्तूचे स्मरण त्याच्या नावापासूनच सुरु होते. वस्तूच्या गुणरुपाचे स्मरण त्याचया नावापासूनच सुुरु होते. वस्तूच्या गुणरुपाचे स्मरण करण्यासाठी ती वस्तू प्रथम पाहिलेली असावी लागते. म्हणजेच स्मरणासाठी नामच सुलभ आणि परिपूर्ण ठरते. म्हणूनच सर्व पंथ नामस्मरणाचा आग्रह धरुन आहेत. ‘‘एकतत्व नाम दृढ धरी मना । हरिसि करुणा येईल तुझी ।।’’