रहस्याचा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 04:05 AM2019-04-24T04:05:32+5:302019-04-24T04:06:36+5:30
इथल्या प्रत्येक घटनेमागे हेतू असतो. जन्म आणि मृत्यूमागेसुद्धा निसर्गाचा गुपित हेतू असावा.
- विजयराज बोधनकर
इथल्या प्रत्येक घटनेमागे हेतू असतो. जन्म आणि मृत्यूमागेसुद्धा निसर्गाचा गुपित हेतू असावा. हे अंतराळ अनंत ग्रह ताऱ्यांनी व्यापलंय. त्यातलीच एक पृथ्वी आहे. हे अवकाश अनंतम्य प्रतीक आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. इथल्या प्रत्येक जिवाची एक पक्की भूमिका आहे. नियतीने ती ठरवून दिली आहे. याचं रहस्य कुणालाच ठाऊक नसल्यामुळे अनेक उत्तरांची प्रतीक्षा आहे. मानव हाच भाषेतून व्यक्त होणारा जीव आहे. सर्वात जास्त बुद्धीचा वापर करणारा जीव म्हणून मानवाकडे बघितलं जातं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे बहुतांश कमी-जास्त फरकाने सर्व जिवांमध्ये आढळून येत राहतं, परंतु सर्वात जास्त या षड्रिपूच्या आधिन झालेला आढळून येतो. याचे कारण त्याचे अज्ञान. नियतीने प्रत्येक मानवी जिवाला भिन्न-भिन्न घडविले आहे. त्यांचे स्वभावगुण, दोष हे निसर्गनिर्मित असतात. याच बळावर ही पृथ्वी कार्यरत आहे. पाऊस जसा जगवितो, तसा नासाडी करीत सुटतो. ज्या हवेमुळे आपण श्वासोच्छवास घेतो, त्याच हवेचं उग्र वादळात रूपांतर झालं की, गावंच्या गावे उद्ध्वस्त होतात. त्याचप्रमाणे, मानवाच्या अस्तित्वाचं आहे. सात्विक, राजसी, तामसी या प्रवृत्ती नियतीच्या रचना आहे. मवाळ आणि जहाल स्वभावरचनासुद्धा जन्मताच मानव सोबत आणतो. या सर्व नियतीच्या कक्षा आहेत. त्याचा ज्या व्यक्तीला अभ्यास असतो, तो शांत राहून नियतीचे हे सारे खेळ बघत असतो. या गोष्टी लक्षात घेता, नियतीच्या या रहस्यमय रचनेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तो (न) केल्यामुळेच माणूस सतत दु:खाच्या फेºयात अडकलेला असतो. त्याचसाठी नियतीने वाईट वृत्तीची निर्मिती केली असावी. यालाच देव—दानवी युद्ध म्हणतात. या रहस्याचा अभ्यास, चिंतन, मनन करणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.