स्पर्धात्मक संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:00 AM2019-03-13T05:00:45+5:302019-03-13T05:04:56+5:30
आपण एका अति-स्पर्धात्मक जगात वावरत आहोत ज्या ठिकाणी प्रत्येकालाच सर्वोत्तम व्हायचे आहे.
- सद्गुरू जग्गी वासुदेव
प्रश्न : आपण एका अति-स्पर्धात्मक जगात वावरत आहोत ज्या ठिकाणी प्रत्येकालाच सर्वोत्तम व्हायचे आहे. माझ्यासाठी योग्य मार्ग कोणता हे ठरविणे मला अवघड जात आहे; कारण मी जरीही एखाद्या गोष्टीत चांगला असलो, उदाहरणार्थ नृत्य, तरी तेथे माझ्यापेक्षा अधिक चांगले कोणीतरी असतेच. समाजाच्या आपल्याकडून सर्वोत्तम असण्याच्या अपेक्षांऐवजी केवळ आनंदी राहण्याच्या एकमात्र उद्देशासाठी एखादी कृती करण्याची प्रेरणा मी कशी मिळवू शकतो?
सद्गुरू: आपल्याला केवळ आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखवायची असते. ही एक व्याधी आह़े कारण तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंद मानत नाही, तर इतरांकडे नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही आनंद मानत असता. जेव्हा इतर लोकांच्या वेदना हा तुमच्या आनंदाचा स्रोत असतो, तेव्हा तो एक आजार आहे असेच म्हणावे लागेल. थोड्या कालावधीसाठी स्पर्धा करणे ठीक आहे. तुम्हाला शर्यतीत धावायचे आहे, ठीक आहे. आपली क्षमता अधूनमधून तपासून पाहण्यासाठी आपण खेळू शकतो आणि जणू काही आयुष्य यावरच अवलंबून असल्यासारखे शर्यत लढवू शकतो! परंतु जीवन ही शर्यत नाही. जीवन जर शर्यत बनले आणि जर तुम्हाला जिंकायचे असेल, तर तुम्हाला सर्वांत प्रथम अंतिम रेषेपर्यंत पोहोचावे लागेल. याचा अर्थ तुम्हाला कळतो का? मग तुम्ही न जिंकलेलेच बरे, तुम्ही सर्वोत्तम नसलेलेच चांगले. जितके उत्तम बनण्याची तुमची क्षमता आहे तितके उत्तम तुम्ही बनले पाहिजे. जे काही तुम्ही करू शकता, ते घडलेच पाहिजे.