हरी चिंतनाने मनाला सर्व सुखांचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 08:31 AM2019-01-14T08:31:47+5:302019-01-14T08:34:59+5:30
मन हे लोलूप होऊन विषयात गुंतलेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी विषयाकडे धाव घेते. त्या मनाला विषयापासून मागे फिरवायचे असेल तर भगवंताचे चरण किंवा त्याचे नामस्मरण हेच त्यासाठी बलवान व शूर आहे.
मन हे लोलूप होऊन विषयात गुंतलेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी विषयाकडे धाव घेते. त्या मनाला विषयापासून मागे फिरवायचे असेल तर भगवंताचे चरण किंवा त्याचे नामस्मरण हेच त्यासाठी बलवान व शूर आहे. मनात जेव्हा एखादी वासना तयार होते, ती वासना त्या विषयाला चिटकून राहाते. त्यापासून ती दूर जाऊच शकत नाही. मग त्यापासून काही साध्य होईल का अनर्थ होईल, याचाही विचार ते मन करू शकत नाही. फक्त त्या मनाला आपली भूक भागविणे एवढेच माहीत असते. त्याच्या विपरीत परिणामाचा ते मन विचार करत नाही. मनाला आवर घालायचा असेल तर विठोबाचे पाय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मनाला स्थिर करायचे असेल तर भगवंताचे चरणच स्थिर करू शकतात
‘मना तेथे धाव घेई ।
राहे विठोबाच्या पायी ।।
तुका म्हणे जीवा।
नको सोडू या केशवा।।’
या अभंगावरूनही हे लक्षात येते. म्हणून मनुष्य जातीला संतांनी जो उपदेश केला तो हाच की, मनाला स्थिर करा- त्यासाठी अखंड चिंतन करा. मनापासून हरिचिंतन करून मनाला सर्वसुखांच्या लहरी अनुभवू द्या. ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ नसेल तर साबण काय करू शकेल, त्याप्रमाणे ‘मन’ स्थिर किंवा शुद्ध नसेल तर ब्रह्मज्ञानाचा उपदेशही लागू पडत नाही. कारण विषयासक्त मन भजनाकरिता सवड मिळू देत नाही. ‘मन’ भव नदीत बुडवून टाकते; पण त्या परमात्म्याला शरण गेल्यास तो त्यातून तारत असतो.
काया, वाचा, मनाने भक्ती केल्यास ईश्वरूपी सगुण संपत्ती आपल्या हाती लाभते. त्या रूपाला नावारूपाला आणता येते. सगळ्या जगाला त्या नियंत्याची ओळख करून देता येईल. हा सर्व मनाचा खेळ आहे. स्थिर मन भवसिंधूच्या पार पोहोचवणारे ठरते. सर्व साधनांचे सार मनाला स्थिर करणे होय. कारण मन स्थिर झाल्याशिवाय योग-यागादी-तपे साध्य होणार नाहीत. भक्तवत्सल, दीननाथ म्हणून ज्याची त्रैलोक्यात ओळख आहे अशा विठ्ठलाच्या भक्तीचा कळस होणे हे मनाचे प्रथम काम आहे. मनाचा विश्वास असला की सर्व साधने सफळ होतात. द्वंद्व राहात नाही. सर्व द्वंद्वापासून मुक्त होऊन मनाची अवस्था स्थिर बनते. मन स्थिर झाल्यास कशाचाही निर्बंध राहात नाही.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)