अनुभव जीवनाला निश्चित दिशा दाखवितो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:26 AM2019-07-29T07:26:07+5:302019-07-29T07:26:32+5:30
अनुभवानुसार माणूस वागतो. तसाच तो संसारात व्यवहार करतो. अनुभवामुळे तो चाणाक्ष होतो. त्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर अनुभवाने तो साध्य करतो.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
माणसाला अनुभवातून खूप काही शिकता येते. अनुभव हाच माणसाची खरी ओळख करून देत असतो. मनाला अनुभवाच्या वाटेने जाऊ द्या. अनुभवातून माणूस शहाणा होतो. बाह्य प्रपंचाची ओळख होते. माणूस वेगवेगळ्या गोष्टींचे चिंतन सोडून देतो. अनुभवाप्रमाणे मन वळवतो. मनाला सुखाची चटक लावतो किंवा दु:खाची चाहूल कळवतो. संसारात किंवा परमार्थात अनुभव निश्चय पक्का करतो. अनुभव जीवनाला एक निश्चित दिशा दाखवितो. अनुभवी माणूस आपले मन आपल्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. इंद्रियांनी नेमलेल्या स्थितीत न राहाता आपल्या अनुभवानुसार इंद्रियांना वळवितो. मनाला चालना देतो. बुद्धीला स्थिर करून संकल्पाची येरझारा थांबवितो. अनुभव प्रगट करता येतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे’.
अनुभवानुसार माणूस वागतो. तसाच तो संसारात व्यवहार करतो. अनुभवामुळे तो चाणाक्ष होतो. त्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर अनुभवाने तो साध्य करतो. अनुभवामुळे मनाला पाप-पुण्यादी कर्म कळते. योगमार्गाचा अनुभव कसा आहे, हे योगीच सांगू शकतील. तसेच संपत्तीवान माणूस संपत्तीचा अनुभव सांगू शकेल. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपला अनुभव सांगते. त्यामुळे अन्य व्यक्ती तसा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. व्यर्थ बोलण्याचा अनुभव, कमी बोलण्याचा अनुभव, शूरवीरांचा अनुभव, साधू-संतांचा अनुभव, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभव, संरक्षण, अर्थक्षेत्रातील अनुभव, प्राण्यांचा, वनस्पतींचा अनुभव असे निरनिराळे अनुभव असतात. अनुभवी माणूस ज्ञानचक्षूंनी सर्वांकडे पाहतो. तो कुठलीही गोेष्ट दृष्टीआड करीत नाही. आपापल्या विषयानुसार तो कळकळीने खरे सांगतो. मनाच्या स्वभावाचा तो पत्ता सांगतो. सारासार बुद्धीला अनुभव भ्रमात पाडत नाही. अनुभवी माणूस आपल्या ठिकाणी अचल असतो. त्याचे व्यापकपण तो आपल्या अनुभवाने कवटाळतो. तो सम-विषम भाव जाणत असतो. मनाला स्थिर कसे करायचे याचा अनुभव तो सांगत असतो. मनाचा स्वभाव चपळ आहे; पण मौन धरून किंवा ईश्वराचा जप करून चंचल मन स्थिर होऊ शकते. हा संतांचा अनुभव आहे. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना होऊ शकत नाही. कारण मन अनावर आहे, चपळ आहे. परंतु मनाला आवर घातला की, इंद्रियांवर ताबा मिळविता येतो. इंद्रियांना जिंकले की, आत्मसुखाचा प्रसाद मिळतो. हाच अनुभव अनेक योगी सांगतात. अनुभव हीच सुखाची खरी गुरूकिल्ली आहे.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)